मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर पेटीएमच्या शेअर्सची सतत घसरण सुरू आहे. पेटीएम पेमेंट्स बँकबाबत रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे सोमवारी शेअर बाजारात पेटीएमच्या शेअर्सवर दबाव दिसून ते घसरण्याची शक्यता आहे. पेटीएमने आपल्या व्यवसायात विविधता आणली आहे. लहान दुकानदारांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत पेटीएमच्या वॉलेटचा वापर वाढलेला आहे. म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि इतर पर्यायांमध्येही पेटीएम गुंतवणुकीचा पर्याय देत आहे. परंतु सध्याच्या अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे पेटीएमचा बळकट पायाही हलला आहे. परिणामी त्याच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
पेटीएम पेमेंट बँकवर नव्या ग्राहकांना जोडण्यापासून रोखण्याच्या निर्णयाचा सध्याच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँकेकडून या निर्णयात पेटीएम पेमेंट बँकेचे कामकाज, ग्राहकांकडून केला जाणारा आर्थिक व्यवहार आणि खात्यांसदर्भात कोणताही निर्देश किंवा सल्ला देण्यात आलेला नाही. ग्राहकांचा पैसा, देवाण-घेवाण किंवा वॉलेट रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्देशाच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे ग्राहकांवर या निर्देशांचा कोणताही परिणाम होणार नाही.
रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान पर्यवेक्षकांना चिंताजनक गोष्ट आढळली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नव्या ग्राहकांना जोडण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर २०२१ मध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. पेटीएम पेमेंट्स बँकेने आरबीआयला फायनल सर्टिफिकेट ऑफ ऑथरायजेशन (सीओए)साठी एक निवेदन पाठविले होते. त्याचा तपास केला असता, त्यात पेटीएम पेमेंट्स बँकेने दिलेली माहिती कंपनीची आर्थिक परिस्थिती दर्शवत नाही, असे आढळले होते.