नवी दिल्ली – देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गंंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (२० एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आहे. तसेच ते देशातील लस उत्पादकांसोबतही चर्चा करणार आहेत. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होतो का, याकडे लक्ष लागले आहे.
देशात लॉकडाउन लावण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल नसले तरी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लॉकडाउन लावण्याची शक्यता नाकारली आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख अधिकार्यांशी चर्चाही केली होती. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का याबाबत देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
रोज नवे उच्चांक
देशात कोरोना रुग्णांचे रोज नवे उच्चांक स्थापित होत आहेत. देशात सोमवारी २,७३,८१० रुग्ण आढळले. १,६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा दीड कोटींच्यावर पोहोचला आहे. महाराष्ट्रातही सोमवारी ५८ हजारांवर रुग्ण आढळले होते.