मुंबई – हवामान खात्याच्या अंदाज व्यक्त करण्यावर सर्वसामान्य जनता कायमच शंका व्यक्त करीत असते. पाऊस येणार म्हटले की ऊन पडणार आणि तापणार म्हटले की पाऊस पडणार अशी स्थिती हवामान खात्याची आहे. कोकणासह पश्मिच महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजविला. दरडही कोसळल्या. यासंदर्भात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र अतिवृष्टीची नेमकी व्याख्या काय आहे, असा सवाल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवामान खात्याला केला आहे.
हवामान खाते जेव्हा अतिवृष्टी होणार असे सांगते तेव्हा त्याची काही पातळी ठरलेली असणे अपेक्षित आहे. २०० मिली मीटर (मिमी) पाऊस पडणार असे खात्याने सांगितले होते. पण त्या दिवशी २०० मिमी पेक्षाही कितीतरी जास्त पाऊस पडला. त्यामुळे आता खरे तर हवामान खात्याने पावसाचा इशारा देताना आपल्या व्याख्या बदलण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर अनपेक्षित आणि भयंकर घडले. दरड कोसळल्या, महापूर आले, पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली, अनेक गावांचा संपर्क तुटला, अनेक शहरे पाण्यात आहेत. अतिवृष्टीचीही मर्यादा ओलांडून सारे काही घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याने हेवी रेन (जोरदार पाऊस) म्हणजे ६४.४ ते ११५.५ मिमी, व्हेरी हेवी रेन (मुसळधार पाऊस) म्हणजे ११५.६ ते २०४.४ मिमी आणि एक्स्ट्रीमली हेवी रेन (अतिवृष्टी) म्हणजे २०४.४ मिमी पेक्षा जास्त पाऊस अशी व्याख्या स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रातील महाबळेश्वर, कर्नाटकातील आगुम्बे, मेघालयातील चेरापुंजी याठिकाणी ४०० ते ६०० मिमी पाऊस झाला. इतर ठिकाणांवर हवामान खात्यासाठी सांगितल्याप्रमाणे पाऊस आला, पण त्याची तीव्रता बघता व्याख्या स्पष्ट होण्याची गरज निर्माण झाली. अशावेळी पूर्वसंकेत, पूर्वसूचना हवामान खात्याकडून मिळणे अपेक्षित आहे, असे मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली शंका योग्य असली तरीही एखाद्या विशिष्ट्य जागी ४०० ते ६०० मिमी पाऊस (ढगफुटी) होईल, असे सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारावर सांगणे जरा अवघडच असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.