मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात उन्हाळ्याला प्रारंभ झाला असतानाच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्याच्या काही भागात पुढील पाच दिवस ढगाळ हवामान आणि पावसाचा इशारा विभागाने वर्तविला आहे. त्याचा मोठा परिणाम राज्यातील शेतपिकांवर होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ७ ते ९ मार्च दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान व पश्चिम मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात उन्हाची तीव्रता कमी होणार आहे. बदलत्या या हवामानामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. रब्बीचा हंगाम काढणीला आला आहे. कांदा, ज्वारीसह अन्य पिके काढणीसाठी आली आहेत. आणि आता पावसाचा अंदाज दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1500029291207094272?s=20&t=dY7YliieSjwDBJ4fBZzh7w