मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. मेच्या मध्याकडे जात असताना तापमानाचा पारा वाढतच आहे. त्यातच आता बिहार, ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्याने महाराष्ट्रात देखील हवामान बदल होणार आहे. त्यातच आजपासून दोन-चार दिवसात मुंबईसह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील आंबा काजू तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बागायती पिकांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात कडक ऊन आणि काही भागात अवकाळी पाऊस असे विचित्र वातावरण सध्या राज्यात आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दि. १३ मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची आहे. तसेच मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची स्थिती असेल. तर अकोला व अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुढचे चार दिवस उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानापासून सुटका मिळणार आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्येही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सध्या या संदर्भात काही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. दुसरीकडे महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर पुण्यातही अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नागपुरातही ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसेच नाशिकमध्येही अंशतः ढगाळ वातावरण राहील.