डेहराडून – योगगुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमधील विस्तव शमण्याचे चिन्ह दिसत नाहीत. बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आयएमएने संताप व्यक्त करून माफी मागण्याची मागणी केली होती. त्यावर बाबा रामदेव यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी दोन्ही बाजूची कटुता कमी होताना दिसत नाहीये.
बाबा रामदेव यांच्या पतंजलीने उत्पादित केलेल्या कोरोनिल औषधाचे परीक्षण नद्यांमध्ये आढळणाऱ्या जेब्रा माशावर केला आहे, असा दावा उत्तराखंडमधील आयएमएचे सचिव डॉ. अजय खन्ना यांनी केला आहे. पायथोमेडिसिन या नियतकालिकात पतंजलीने दिलेल्या माहितीवरूनच एक शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये ही माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. खन्ना सांगतात, नियमांनुसार माशांवर परीक्षण केलेले औषध माणसावर वापरले जाऊ शकत नाही. माशावरही व्यवस्थितरित्या परीक्षण करण्यात आलेले नाही. या औषधाचा परिणाम माशावर होत आहे की नाही हे पाहण्यासाठी आधी माशाला कोरोनाबाधित करायला हवे होते. परंतु असे काहीच झाले नाही.
नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात माशाला स्पाइक प्रोटिन देण्याबाबत लिहिले आहे. हे संशोधन पूर्णपणे चुकीचे असल्याचे डॉ. खन्ना यांचे म्हणणे आहे. या आधारावर पंतजली किंवा बाबा रामदेव यांच्याकडून कोरोनिल औषधाबाबत कोणताही दावा करणे चुकीचे आहे.
औषधांचे परीक्षण करण्याबाबत काही निकष आहेत. त्या निकषांचे पालन केले गेले नाही, तरी हे औषध प्रभावी आहे अशा निष्कर्षावर कोणी कसे पोहोचू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
डॉक्टरांकडून काळा दिवस
अॅलोपॅथी वैद्यकीय पद्धतीबाबत बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरून देशभरात डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन, प्रादेशिक आरोग्य सेवा संघ आणि रेजिडेंट डॉक्टर असोसिएशनशी संबंधित डॉक्टरांकडून काळा दिवस पाळण्यात आला. यादरम्यान डॉक्टरांनी तोंडावर काळी पट्टी बांधून विरोध दर्शविला.