नाशिक – शहरातील ऑक्सिजन, रेमडेसिविरसह अन्य बाबींचा अपुरा पुरवठा होत असल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी सरकारकडून योग्य तो दिलासा त्वरीत मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे पदाधिकारी व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची बैठक पार पडली. नाशिक मधील सध्या कोरोनाची परिस्थिती तसेच ऑक्सिजन आणि जीवनावश्यक औषधांची कमतरता यावर आय एम ए च्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री यांना विशेष लक्ष घालून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
सध्याच्या परिस्थितीत नाशिकला १२५ ते १५० टन ऑक्सिजनची गरज असून, आता फक्त सुमारे ८५ टन ऑक्सिजनचा पुरवठा नाशिकला होत आहे. यावर सरकारकडे विशेष मागणी करून अधिक ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच इंडस्ट्रिअल ऑक्सिजन मेडीकल वापरासाठी वळवता येईल यावरही चर्चा झाली. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट अधिकाधिक प्रमाणात कसे तयार करण्यात येऊ शकतात, आणि भविष्यातही अशी समस्या येऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ते निर्णय घ्यावेत, अशी विनंती आय एम ए अध्यक्ष डॉ हेमंत सोननीस यांनी केली.
त्याचप्रमाणें रेमीडीसेविर व जीवनावश्यक औषधांचा तुटवडा जाणवत असून,यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
पालकमंत्र्यांनी यावेळी बोलतांना प्रशासन पूर्णपणे डॉक्टरांच्या पाठीशी असून, लवकरात लवकर ऑक्सिजन, रेमडीसेविर व इतर आवश्यक गोष्टीचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. तसेच या करोना संकटात नाशिक मधील सर्व वैद्यकीय व्यावसायिक अपुरी साधने असूनही खूप चांगले काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनी देखील या काळात संयम बाळगावा आणि प्रशासनाला आणि डॉक्टरांना सहयोग करावे असे आवाहन देखील केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन या युद्ध परिस्थितीत प्रशासनास पूर्ण सहकार्य करत असल्याचे आश्वासन प्रतिनिधींनी दिले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रंजन ठाकरे तसेच इंडियन मेडिकल अससिएशन चे अध्यक्ष डॉ.हेमंत सोननीस, उपाध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, डॉ. शोधन गोंदकर, डॉ. निलेश निकम आदी उपस्थित होते.