काल झालेल्या झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सर्व डॉक्टर, नर्सेस आणि इतर आणि आरोग्य कर्मचारी व्यथित झाले. कोरोनाच्या दुसर्या लाटे बरोबर शर्थीची झुंज देत असताना कालची घटना सर्वांना अतिशय क्लेशदायक होती. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने नाशिक मधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः नाशिक महापालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आपले सर्वांचे मनोबल उचलून धरण्यासाठी परिसंवाद आयोजित केला असे आय एम ए अध्यक्ष डॉ हेमंत सोननीस यांनी सांगितले.
सुरुवातीला या दुर्घटनेत बळी पडलेल्या सर्व व्यक्तींच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहण्यात आली. वक्ते डॉ धनंजय चव्हाण आणि जयंत ढाके हे मानसोपचार तज्ज्ञ होते. या काळात येणाऱ्या नकारात्मक भावना मान्य करणे महत्त्वाचे असून त्यानंतरच आपण त्यांच्यावर प्रयत्नपूर्वक मात करू शकतो आणि कोविड रूग्णांना सेवा देण्याचे कार्य आपण हिरीरीने करत राहू शकतो असे डॉ ढाके यांनी समजावून सांगितले.
जो काम करतो त्यानाच चुकीचे अनुभव येतात कारण ते जबाबदारी घेतात. त्यामुळे कोविड रुग्ण सेवेचे महत्कार्य करत असताना विपरीत घटना घडल्यास नाउमेद होऊ नये आणि पुन्हा नवीन उमेदीने आपले काम करत रहायचे हे डॉ चव्हाण यांनी विविध उदाहरणातून समजावून सांगितले. विज्ञान, श्रद्धा, मदत करण्याची वृत्ती यांच्या सामर्थ्यावर आपण या covid च्या सुनामी वर निश्चितपणे मात करू शकतो असा संदेश देण्यात आला.
संध्याकाळी ८ ते ९ च्या दरम्यान झूमच्या माध्यामातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
डॉ महेश भिरुड यांनी सूत्रसंचालन केले. सचिव डॉ कविता गाडेकर, डॉ नागापूरकर, डॉ गुंजाळ, डॉ पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. नाशिक मधील विविध क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला.