मुंबई – पहिली पत्नी असताना दुसरे लग्न बेकायदेशीर आहे. पण दुसऱ्या लग्नानंतर जन्माला येणारे मुल कसे बेकायदेशीर असेल, असा सवाल करीत कर्नाटक उच्च न्यायालयाने नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला न्याय प्रदान केला. हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
बंगळुरू वीज पुरवठा कंपनी या सरकारी संस्थेत एक माणूस लाईनमन होता. त्याचा २०१४ मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलाने अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केला. पण त्याच्या वडिलांनी पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केले आणि त्या दुसऱ्या लग्नापासून जन्माला आलेला मुलगा बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्याला नोकरी देता येणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले. त्याला मुलाने न्यायालयात आव्हान दिले.
मात्र एकलपिठाने त्याची याचिका फेटाळून लावली. मुलाने जिद्द सोडली नाही आणि मुख्य खंडपीठाकडे दाद मागितली. त्यावेळी न्या. बी.व्ही. नागरत्ना आणि न्या. एच. संजीन कुमार यांच्या खंडपीठाने एकलपिठाचा निर्णय रद्द ठरविला. बाळाला जन्म देणारे आई-वडील बेकायदेशीर असू शकतात, पण बाळ कसे बेकायदेशीर असेल? असा सवाल करून आपल्या जन्मात बाळाची कुठलीच भूमिका नसते, असेही न्यायालय म्हणाले.
माय-बाप नसते तर?
कुठलेही बाळ माता-पित्याशिवाय जन्माला येऊ शकत नाही. खरे तर कायद्याने हे तथ्य स्वीकारून त्याला मान्यता प्रदान करायला हवी की माता-पिता बेकायदेशीर असू शकतात, पण मुल नाही. मुलांना वैध ठरवून कायद्यात एकरुपता आणण्याची जबाबदारी संसदेची आहे, असेही न्यायालय म्हणाले. एवढेच नव्हे तर अशा मुलांच्या सुरक्षेची जबाबदारीही संसदेने घ्यायला हवी, अशी सूचनाही न्यायालयाने केली.