नाशिक – आपल्याच घराच्या आवारातील झाडाच्या फांद्या तोडणे घरमालकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागाने तक्रार दिल्यानंतर गंगापूर रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संगिता बंगला, आकाशवाणी केंद्राजवळ, श्रमिक कॉलनी, गंगापूर रोड येथे खाजगी जागेतील रामफळ वृक्षाचा विस्तार अनधिकृतपणे कमी करण्यात आला. ही बाब नाशिक पश्चिम वृक्षप्राधिकरण विभागाच्या निदर्शनास आली. त्यानुसार उद्यान निरीक्षक किरण गणेश बोडके यांनी जागा मालक श्रीमती पौर्णिमा सुरेश कुमार गुप्ता यांचे विरुध्द तक्रार दिली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५ चे कायद्यान्वये प्रकरण ८ कलम २० (क) अन्वये गंगापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार झाडे करीत आहेत.