मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एका अनोख्या पद्धतीचा छडा लावला आहे ज्यामध्ये बंदरातून कंटेनर मालवाहतूक स्थानकापर्यंत (सीएफएस) कंटेनर वाहतुकीदरम्यान कागदोपत्री नोंद केलेल्या वेष्टित मालात कंटेनरमध्ये भरलेला सुपारीचा नोंद न केलेला माल बदलून सुपारीची तस्करी केली जात होती. तस्करी करणाऱ्या टोळीवर केलेल्या या मोठ्या कारवाईत, डीआरआयने पाच जणांना अटक केली आहे आणि 50 मेट्रिक टना पेक्षा जास्त सुपारी जप्त केली आहे ज्याची भारतात अवैधरित्या तस्करी होत होती. अशी दोन वेगळी प्रकरणे होती, ज्यात महसूल गुप्तचर संचालयाच्या तपासनीसांनी संयुक्त अरब अमिरातीतील दुबई मधून येणारे कंटेनर अडवून 50 मेट्रिक टनाहून अधिक सुपारी जप्त केली.
पहिल्या प्रकरणात, विशिष्ट गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालयाने संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई येथून पाठवलेला 40 फूट कंटेनर अडवला, ज्यात आयात मालाची “चुनखडी” म्हणून कागदोपत्री नोंद करण्यात आली होती. कंटेनरची सखोल तपासणी करण्यात आली आणि 25.9 मेट्रिक टन (अंदाजे) सुपारी खांडाच्या स्वरूपात आढळून आली. 2.23 कोटी (अंदाजे) रुपये किमतीची 25.9 मेट्रिक टन वजनाची सुपारी सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात, डीआरआयने संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथून पाठवलेला 40 फूट कंटेनर अडवला ज्यात आयात मालाची “जिप्सम पावडर” म्हणून कागदोपत्री नोंद करण्यात आली होती. सखोल तपासणीत असे दिसून आले की संपूर्ण मालाची चुकीची नोंद करण्यात आली होती आणि आत सापडलेला माल म्हणजे तागाच्या गोणीत भरलेली अख्खी सुपारी (पोफळी) होती. तपासणीत आढळून आलेली एकूण 2.2 कोटी रुपये (अंदाजे) किमतीची 25.8 मेट्रिक टन (अंदाजे) सुपारी सीमा शुल्क कायदा 1962 च्या तरतुदीनुसार जप्त करण्यात आली.
तपासाच्या आधारे, पहिल्या प्रकरणातील आयईसी धारकासह दोन जणांना अटक करण्यात आली. मात्र, आणखी काही कंटेनरमधून अशीच तस्करी झाल्याचे अधिक तपासात उघड झाले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची शहानिशा आणि कसून चौकशी केल्यावर असे दिसून आले की आणखी दोन कंटेनरमधील सुपारीची तस्करी चुकीची कागदपत्रे सादर करून आणि बंदरातून कंटेनर मालवाहतूक स्थानकापर्यंत (सीएफएस) कंटेनर वाहतूकी दरम्यान वेष्टित (चुनखडी) मालाच्या जागी कंटेनरमध्ये भरलेली सुपारी ठेवण्यात आली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आणखी तीन जणांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सुपारी तस्करीची संपूर्ण प्रक्रिया उघड केली.
तस्करी करणाऱ्या टोळीवर केलेल्या या मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने एकूण पाच जणांना अटक केली आहे आणि 50 मेट्रिक टन पेक्षा अधिक सुपारी जप्त केली आहे. तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात आणि वरील प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पकडण्यात डीआरआयचा सखोल तपास आणि यश हे तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या लढाईसाठी डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे द्योतक आहे.
illegal supari smuggling racket mumbai dri racket burst
Revenue Crime Port Container