दिंडोरी : तालुक्यातील पालखेड बंधारा येथे दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मुद्देमालासह एकास ताब्यात घेण्यात आले आहे .पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व सर्व खातेप्रमुखांची बैठक झाली .या बैठकीत अवैद्य दारू विक्री वर चर्चा झाली होती. यावर दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांनी परिसरातील माहिती घेण्यास सुरुवात केली .
दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत पालखेड बंधारा येथे राहणारा शशिकांत गजानन सोनवणे हा अवैधरित्या चोरट्या रीतीने देशी दारुची विक्री करत असल्याबाबत पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांना बातमी मिळाली. याबाबत पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, कल्पेश कुमार चव्हाण , पोलीस हवालदार अरुण बैरागी , दांडेकर, एस के जाधव पोलीस शिपाई महेश कुमावत व महिला पोलीस शिपाई चव्हाणके यांनी स्वता त्याठिकानी जाऊन खात्री केली असता सदर इसमाच्या ताब्यात पाच खाकी रंगाच्या बॉक्समध्ये २२३ देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या.सदर दारूची किंमत ११ हजार ५९६ रुपये असून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
अवैध चोरून दारूविक्री, कोरोना विषाणू रोग संदर्भात कलमांनुसार शशिकांत सोनवणे यांच्यावर दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . दरम्यान सर्व दुकाने बंद असताना अवैध विक्रेत्यांना दारू कुठून मिळते,बनावट दारू बनवली जात आहे का ? याचा छडा पोलीसांनी लावत अवैध विक्री थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.