नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अनधिकृत ऑनलाइन औषध कंपनीचा भांडाफोड केल्याचा दावा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने केला आहे. या प्रकरणी हैदराबादमधील एका संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून रोख ३.७१ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
अमली पदार्थविरोधी संस्था एनसीबीच्या माहितीनुसार, जेआर इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही औषध कंपनी तेलंगणची राजधानी हैदराबादमधील दोमलगुडा येथे आहे. एनसीबीच्या हैदराबाद उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी छापा मारून अनधिकृत औषध कंपनी चालवणाऱ्या अज्ञात सूत्रधाराला अटक केली.
संशयिताकडून अमली पदार्थांची तस्करी करून मिळालेले ३.७१ कोटी रुपये रोख, अनेक लॅपटॉप, मोबाइल, आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी या उपकरणांचा वापर केला जात होता.
एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंह सांगतात, की जेआर इन्फिनिटीचे कर्मचारी ईमेल आणि व्हीओआयपी (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) च्या माध्यामातून अमेरिका आणि इतर देशांमध्ये ग्राहकांशी संपर्क करत होते आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत येणारे अमली पदार्थांसह विविध औषधी विक्री करत होते.