मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात पुन्हा एकदा एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एका दिवाळखोर कंपनीने तब्बल १९ बँकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. आयएल अॅण्ड एफएस असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीने घेतलेल्या कर्जाचा दुरुपयोग करत देशातील तब्बल १९ बँकांना गंडविले आहे. या आर्थिक फसवणुकीमध्ये कोट्यवधीच्या रकमेचा समावेश आहे.
आयएल अॅण्ड एफएस ही कंपनी देशातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करते. या कंपनीने १९ बँकांकडून कर्ज घेतले होते. मात्र, कंपनीमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर २०१८ मध्ये एनसीएलटी कंपनीमध्ये नवे संचालक मंडळ स्थापन केले. त्यानंतर कंपनीच्या पूर्व संचालकांनी केलेला आर्थिक घोटाळा समोर आला.
फसवणुकीसंदर्भात कॅनरा बँकेने सीबीआयला केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित कंपनीने ६,५२४ कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा घोटाळा केला आहे. आरोपी हे व्हाइट कॉलर गुन्हेगार असून त्यांना कायद्याची चांगली माहिती आहे. कायद्याच्या कचाट्यातून स्वतःला कसे वाचवायचे हे देखील माहित आहे. कॅनरा बँकेशिवाय आर्थिक फसवणूक झालेल्यांमध्ये पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक आणि अन्य बँकांचा समावेश आहे. याप्रकरणी आता पुढील तपास सध्या सुरु आहे.
संशयास्पदरित्या कर्जाचे वाटप
आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. ईडीने याप्रकरणी आयएल अॅण्ड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर काही दिवसांपूर्वी शोध मोहिम राबवली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती.
राज ठाकरेंचीही चौकशी
आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणात ऑगस्ट २०१९ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली होती. २००५ मध्ये ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी कोहिनूर मिल क्र. ३ आणि कोहिनूर सीटीएनएलची स्थापना केली. ठाकरे तीन वर्षांतच या प्रकल्पातून बाहेर पडले होते.
ILFS Fraud 19 Banks Extortion CBI FIR