मंडी (हिमाचल प्रदेश) – कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी पीपीई किट आणि मास्कसाठी कापड तयार केले आहे. एक मास्क तीस रुपयांमध्ये तयार होईल. तर किटसाठीचे विशेष कापड अडीच ते तीन रुपये प्रति स्वेअरसेंटीमीटर असेल. या कापडापासून तयार केलेल्या किटचा वापर साधारण कपड्यासारखे पुन्हा पुन्हा करता येणार आहे. उन्हात ठेवल्यावर हे किट आपोआपच स्वच्छ होण्यास सक्षम असेल. फॅब्रिकमुळे श्वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होणार नाही. मंडीच्या आयआयटीच्या बेसिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग केला आहे.
या संशोधनात निष्पन्न झाले की, या फॅब्रिकपासून बनवण्यात येणारे पीपीई किट आणि मास्क साठ वेळा धुतले तरी त्यांची विषाणूला रोखण्याची क्षमता कायम राहणार आहे. या संशोधनाचे निष्कर्ष अमेरिकेच्या केमिकल सोसायचीच्या प्रतिष्ठीत जर्नल अप्लाईड मटेरियल्स अँड इंटरफेजेसमध्ये नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
या प्रयोगात विकास स्कूल ऑफ बेसिक सायन्सचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित जायस्वाल यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण कुमार, शौनक रॉय आणि अंकिता सरकार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेतून मार्ग काढण्यासाठी अशा काही संशोधनाची गरज असल्याने हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात आहे.
असे आहे तंत्रज्ञान
फॅब्रिकमध्ये मोलिब्डेनम सल्फाइड, एमओएस२ चे नॅनोमीटर आकारांच्या शिटचा वापर करण्यात आला आहे. त्याचे धारदार किनारे चाकूप्रमाणे जीवाणू आणि विषाणूंना मारू शकतात. नॅनोनाइफ मोडिफाईड फॅब्रिक ६० वेळा धुवूनही जीवाणूंना रोखण्यास सक्षम राहू शकते. पीपीई किट आणि मास्क फेकल्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. परंतु सारखे वापरूनसुद्धा या मटेरियलपासून कमी धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे