इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिमाचल प्रदेशात पावसामुळे होणार प्रलय अनेकदा अनुभवण्यात आला आहे. भूस्खलन, ढगफुटीमुळे येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अशात आयआयटीच्या संचालकांनी मांसाहारामुळे भूस्खलन, ढगफुटी होत असल्याचा अजब दावा केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.
हिमाचल प्रदेशात पावसाचा मोठा कहर पाहायला मिळाला आहे. ढगफुटी आणि भूस्खलनमुळे अनेक लोकांचे प्रचंड नुकसान देखील झाले आहे. या पावसाळ्यात २३८ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याआपत्तीनंतर आता आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बेहरा म्हणाले आहेत की, हिमाचलमध्ये हा विनाश मांसाहारामुळे झाला आहे. ते म्हणाले की, हिमाचलमध्ये प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेमुळे ढगफुटी होत आहे. त्यांनी मुलांना मांस न खाण्याची शपथ घेण्यास सांगितले आहे. याचाच एका व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
आयआयटीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा म्हणाले की, ”जर आपण प्राण्यांची हत्या थांबवली नाही, तर हिमाचल प्रदेशचा नाश होईल. तुम्ही प्राण्यांची हत्या करत आहात, त्या प्राण्यांचे पर्यावरणाशी नाते आहे. ते नातं तुम्हाला बघता येत नाही.” ते पुढे म्हणाले, प्राण्यांवरील क्रूरतेमुळे हिमाचलमध्ये भूस्खलन आणि ढग फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. लोक मांस खात आहेत. लक्ष्मीधर बेहरा यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विद्यार्थ्यांना मांसाहर न खाण्याची दिली शपथ
चांगली व्यक्ती बनण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? तुम्हाला मांस खाणे बंद करावे लागेल, असे बेहरा व्हिडिओमध्ये बोलत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर ते विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथदेखील घेण्यास सांगतात.
IIT Mandi Director Himachal Pradesh Cloudburst Controversial Statement