नाशिक – ‘द इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस’ अर्थात IIA या संस्थेच्या राष्ट्रीय, राज्य व स्थानिक नाशिक सेंटरस्तरावरच्या द्वैवार्षिक निवडणूका मागील आठवड्यात पार पडल्या. E-Voting पद्धतीने पार पडलेल्या सदर निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यस्तरावर आर्की. प्रवीण पगार उपाध्यक्षपदी तर आर्की. प्रदीप काळे मानद सचिवपदी निवडून आले आहेत.
नाशिक सेंटरस्तरावर आर्की. रसिक बोथरा (अध्यक्ष), आर्की. समीर कुलकर्णी (उपाध्यक्ष), आर्की. स्मिता कासार-पाटील (मानद खजिनदार), आर्की. रोहन जाधव (मानद सचिव) तसेच आर्की. अमोल चौधरी, आर्की. अंकित मोह्बंसी, आर्की. रोहिणी मराठे, आर्की. कौशल कटाळे व आर्की. सतीश पवार कार्यकारणी सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी चेन्नई येथील जेष्ठ वास्तुविशारद आर्की. सी.आर. राजू यांची तर मानद सह-सचिवपदी पुणे येथील जेष्ठ वास्तुविशारद आर्की. सतीश माने यांची बहुमताने निवड झाली आहे.
‘द इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस’ अर्थात IIA ही भारतातील समस्त वास्तुविशारद व्यावसायिकांची शिर्ष संस्था आहे. १९१७ साली स्थापन झालेल्या व १०३ वर्षांचा दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या IIA चे आजमितीस एकूण २०,००० पेक्षा जास्त सभासद आहेत. भारतातील वास्तुविशारदांना संघटीत करून वास्तुकलेचा प्रसार करणे तसेच वास्तुविशारद व्यवसायात सौंदर्यदृष्टी व व्यावसायिकता वाढीसाठी IIA कटीबद्ध आहे.
कला, वास्तुकला व बांधकाम क्षेत्राशी संबंधित अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर IIA प्रतिनिधित्व करते. International Union of Architects (UIA), Commonwealth Association of Architects (CAA) आणि South Asian Association for Reagional Co-operation of Architects (SAARCH) या आंतरराष्ट्रीय संस्थांशी IIA संलग्न आहे.
महाराष्ट्र राज्यस्तरावर तसेच स्थानिक नाशिक सेंटरस्तरावर देखील, सामाजिक हिताच्या दृष्टीने IIA विविध व्यासपीठांवर कार्यरत आहे. शहरातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित व एकूणच सर्वांगीण विकासासाठी IIA नाशिक सेंटर, इतर संस्थांशी सहकार्याची भूमिका ठेवत मोलाचा वाटा उचलत आहे.
नाशकातील वास्तुविशारदांना संस्थेच्या राज्यस्तरावर मिळालेल्या प्रतीनिधीत्वाबद्द्ल व यशाबद्दल, राज्यभरातील तसेच नाशकातील जेष्ठ वास्तुविशारद, समव्यावसायिक व बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे.