मुंबई – इगतपुरी पाणीपुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पाणीपुरवठा केंद्रास 1988 मध्ये योजना कार्यान्वित झाल्यापासून आजतागायत मोठ्या स्वरूपाची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती .या पार्श्वभूमीवर योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे 41 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या घसारा निधीतून उपलब्ध करून देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
निवृत्त व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये कंत्राटदार नोंदणी
शासकीय, निमशासकीय सेवेतून सेवा निवृत्त झालेल्या अभियंत्यांना व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये कंत्राटदार नोंदणी देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 5.1.2019 च्या शासन निर्णयातील तरतुदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास लागू करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते. तसेच नगरविकास व ग्रामविकास विभागाचे अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.