नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भुताटकी केल्याचा आरोप करून छळ केल्याने गावातील आठ – दहा कुटुंबियांना गाव सोडावे लागल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील धारगावच्या बोरवाडी पाड्यावर घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळजनक निर्माण केली. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंधश्रध्दा निर्मुलन समितीनेने या घटनेची दखल घेतली आहे. राज्यात जादुटोणा कायदा असतांना पुरोगामी महाराष्ट्रात ही घटना घडल्यामुळे सर्वत्र या प्रकाराचा निषेध व्यक्त केला जात आहे.
बोरवाडी पाड्यावर झालेल्या एका मुलाच्या मृत्यूला हे कुटुंब जबाबदार असून त्यांनी भुतबाधा केल्याचा आरोप मृत मुलाच्या आईने केल्यानंतर या आठ ते दहा कुटुंबियाचा छळ सुरु झाला. त्यानंतर या कुटुंबियात वादही झाला. पोलिसांनी काही दिवसापूर्वी दोन्ही कुटुंबियांना समज दिली. पण, तरी सुध्दा मानसिक छळ सुरु झाल्यामुळे आठ ते दहा कुटुंबियांना आपले घर पाडून स्थलांतर केले. इगतपुरी तालुक्यातीत अंधश्रध्देचे प्रकार अगोदही समोर आले आहे. पण, या घटनेत थेट गावच बदलण्याची वेळ आल्यामुळे याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.