इगतपुरी – कसारा घाटात बंद पडलेल्या वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या ३ दरोडेखोरांना पोलिसांनी अर्धा तासाच्या थरारक नाट्यानंतर ताब्यात घेतले आहे. दरोडेखोराशी यावेळी झालेल्या झटापटीत एका पोलीसावर धारदार हत्याराने हल्ला झाल्याने ते जखमी झाले आहेत. संशयित दरोडेखोरांमध्ये इगतपुरी येथील १ जण असल्याचे समजते.
आज पहाटच्या वेळी नाशिकच्या दिशेने कसारा घाट उतरून मुंबईकडे जाणारा ट्रक क्र. एम एच ४० बी जी ६१६५ या ट्रकचा पाटा तुटला. रस्त्याच्या कडेला ट्रक लावून महामार्ग पोलिसांनी गॅरेज उपलब्ध असलेल्या गॅरेजचा संपर्क करून पोलीस गस्तीसाठी निघून गेले. यावेळी ट्रक जवळ पल्सरवरून तिघे तरुण अंगावर पूर्ण काळे कपडे घालून आले. परिधान केले होते. त्यांनी ट्रकचालकास आवाज देऊन दादागिरी आणि ट्रकवर दगडफेक केली. ट्रक चालकाने तातडीने महामार्ग पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत या दरोडेखोरांनी ट्रकमध्ये चढून ट्रक चालक विकी खोब्रागडे व क्लीनर निधी वासनिक ह्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेतले. महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे माधव पवार, मुरलीधर गायकवाड, दीपक दिंडे व संजय नंदन हे पोलीस तिथे पोहचले. हे समजताच दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी जंगलात पळ काढला. या तिघां दरोडेखोरांमधील संशयित मुख्य सूत्रधार विजय रामदास ढमाळे रा. इगतपुरी याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवल्याने, दरोडेखोर विजय ढमाळे याने त्यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले. कसारा पोलिसांनी आरोपींकडील दुचाकी एमएच १५ एचबी १०७५ ही जप्त करून तिघा संशयित दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे.