इगतपुरी – शहरात गँगवारचा भडका उडाला आहे. यामुळे पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याचे समजते तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन गटात तुफान राडा झाला असल्याचे वृत्त असून इगतपुरीचे नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. पोलिसांनी इगतपुरी शहरात संचारबंदी लागू केली आहे. बाजारपेठा बंद झाल्या आहेत. मयत असलेल्या व्यक्तीचे नाव राहुल साळवे असून त्याच्यावर पोलिसांकडे विविध गुन्हे दाखल आहेत. संशयित आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली असून दगडफेक आणि तलवारीने राडा झाला आहे. या घटनेमध्ये ४ चारचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यासह ७ मोटारसायकलींना सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. ५ घरांना ह्या घटनेमुळे चांगलाच फटका बसला असून पत्रे, दरवाजे तुटले आहे. काचा फुटल्या असून खिडक्या आणि दरवाजावर तुफान दगडफेक झाली आहे. दरवाजा उघडत नाही म्हणून दरवाज्यावर तलवारीचे वार करून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी भेट दिली.
पोलिसांकडून योग्य ती कार्यवाही सुरू
इगतपुरीतील घटनेबाबत पोलिसांकडून योग्य ती कार्यवाही सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून आजची घटना घडली आहे. कालच नांदगाव सदो या गावी एक गटाची भांडणे झाली. त्यातून आजच्या मारामारीची घटना झाली. पोलिसांकडून इगतपुरी शहरात सध्या शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. नागरिकांकडे याबाबत सीसीटीव्ही फुटेज अथवा अन्य कोणत्याही प्रकारची माहिती असेल तर न घाबरता पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. संबंधितांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
– सचिन पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण