सुनिल बोडके, इगतपुरी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडाच्या कास भागात शनिवारी वनविकास महामंडळाच्या १२९ कंपाउंडमध्ये अज्ञात तस्करांनी दिवसाढवळ्या खैर जातीच्या झाडांची अवैद्य वृक्षतोड केली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जोपर्यंत येऊन दोषींवर कारवाई करत नाही. तोपर्यंत रात्रभर ठिय्या देण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. तस्करी होत असलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी दोन रात्रभर ठिय्या दिल्याने गंभीरता वाढली आहे.
हरसूल भागात ठाणापाडा परिसरातील वनविकास महामंडळाच्या बोरीपाडा रेंज मधील कास येथे पावंधी कार्यक्षेत्रात शनिवारी खैराच्या सात झाडांची वृक्षतोड झाली आहे. चार झाडे तोडून टाकली तर तीन झाडे अर्धवट धोकादायक स्थितीत आहेत. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन दोषींवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत ग्रामस्थांनी तस्करी होत असलेल्या झाडाजवळ ठिय्या ठोकला आहे. यामुळे वनविकास महामंडळाची पूर्णतः धावपळ उडाली असून अधिकारी अनभिज्ञ आहे.
हरसूल भागांत वनविकास महामंडळ अनेक ठिकाणी वृक्षारोपण झालेले आहे. मात्र कुंपनच शेत खात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून झाला. कास ह्या दुर्गम भागात अनेक वृक्षांना संबंधित विभागच कुऱ्हाड लावून सर्रास वृक्षतोड करीत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेला 24 तास उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत तस्करी होत असलेल्या झाडापासून हटणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामस्थांनी घटनास्थळी मुक्काम ठोकला असून हा पूर्णतः भाग जंगली आहे. याच भागात बिबट्या, तरसाचे वास्तव्य आहे. सरपटणारे प्राणी सुद्धा आहेत. एखाद्या व्यक्तीस दुखापत झाल्यास किंवा सर्पदंश झाल्यास त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी यादव पवार, जयवंत राऊत, पुंडलिक महाले, काळू वड, मधुकर महाले, नामदेव भुसारे, तुकाराम मोंढे, जानू वड, रामदास चौधरी, तुळशीराम राऊत, रामदास पवार, देवराम अवतार, विष्णू शेंगे, राजू गोतरणे, भगवान बुधर, सखाराम बुधर, वनपाल अर्जुन किरकिरे, एम. आर. साळुंखे, वनरक्षक एन. एस. पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चोवीस तास उलटूनही अद्याप वरिष्ठ अधिकारी आलेले नाहीत
खैरांची वृक्षतोड ही वनविकास महामंडळाकडूनच करण्यात आली आहे. मात्र त्यात कोण दोषी आहे. त्यासाठी वरिष्ठांची घटनास्थळी भेट महत्वाची असून दोन दिवसापासून जवळपास २०० हुन अधिक तस्करीच्या झाडाजवळ ग्रामस्थांनी ठिय्या दिला आहे. मात्र चोवीस तास उलटूनही अद्याप वरिष्ठ अधिकारी आलेले नाहीत.
– यादव पवार, ग्रामस्थ कास