इगतपुरी – इगतपुरी शहरातील शिवाजीनगर परिसरात बिबट्याचे २ बछडे जेरबंद करण्यात इगतपुरीच्या प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे. १५ दिवसांपूर्वी २ बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर लावलेल्या एकाच पिंजऱ्यात २ बछडे अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, वनरक्षक फैजअली सय्यद, मुज्जू शेख आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. बछडे पाहण्यासाठी इगतपुरी शहरातील नागरिक गर्दी करीत असून कोणीही गर्दी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा वन विभागाने दिला आहे. इगतपुरी शहर परिसरात बिबट्याच्या दहशतीने भितीचे वातावरण पसरलेले होते. एका नागरिकावर सुद्धा बिबट्याने हल्ला केला होता. सर्व बिबटे पिंजराबंद झाल्याने नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले आहेत.