इगतपुरी – तालुक्यातील काळुस्ते भागातील दरेवाडी येथे १५ दिवसांपासून चकवा देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आज अखेर यश आले. ह्या भागातील नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास टाकला आहे. १० वर्षीय बालकाचा बळी आणि ६ वर्षीय बालकाला जखमी करणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकल्याने वन विभागाने समाधान व्यक्त केले. वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखालील वन परिमंडळ अधिकारी पोपट डांगे, भाऊसाहेब राव, दत्तू ढोन्नर, शैलेंद्र झुटे यांच्या पथकाचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
एक बालकाचा बळी आणि एका बालकाला जखमी करणारा बिबट्या पकडण्यासाठी इगतपुरीचा वन विभाग अखंडपणे प्रयत्न करीत होता. मात्र ४ पिंजरे लावूनही गेल्या १५ दिवसांपासून हा बिबट्या हुलकावणी देत होता. त्यामुळे नागरिकही भीतीच्या वातावरणात होते. वन विभागाने सुरू केलेली जागृती, बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न आणि नागरिकांनी केलेले सहकार्य यामुळे अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. आज पहाटे बिबट्या ताब्यात आल्याचे समजताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. वन विभागाकडून बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील सोपस्कार करण्यात येणार आहेत.
भयमुक्त परिस्थिती निर्माण करू.
माझ्या वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे अखंड प्रयत्न, नागरिकांचे सहकार्य यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात आम्ही यशस्वी झालो. तालुक्यात जनजागृतीचे कार्यक्रम सुरूच असून त्यामुळे आमच्या सामूहिक प्रयत्नांना यश मिळू शकले. यापुढेही नागरिकांनी न घाबरता आम्हाला सहकार्य केल्यास भयमुक्त परिस्थिती निर्माण करू.
– केतन बिरारीस, वन परिक्षेत्र अधिकारी इगतपुरी