इगतपुरी – देशाच्या संरक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्र सैनिक सचिन गणूजी चिकणे यांचे आज कर्तव्यावर असतांना दुर्दैवी निधन झाले. अंतीमक्षणी ते भोपाळ येथे कर्तव्यावर होते. यावेळी त्यांची अचानक तब्बेत खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. इगतपुरी शहर आणि तालुक्यात याबाबत माहिती समजताच सगळीकडे शोककळा पसरली. गेल्या १५ वर्षांपासून सचिन चिकने सैन्यात कार्यरत आहेत. सुटीवर आल्यावर मनमोकळे पणाने ते मित्र आणि नागरिकांना देशसेवा ह्या विषयावर भरभरून बोलायचे. त्यांच्या अचानक जाण्याने खरा देशभक्त गमावला असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटली आहे. बुधवारी भोपाळहुन त्यांचे पार्थिव इगतपुरीत दाखल होणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.
इगतपुरी शहरातील सह्याद्रीनगर भागात असणारे कै गणूजी यांचा सचिन हा मुलगा असून त्यांना आई, एक भाऊ, एक बहिण, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. लहानपणापासून देशाची सेवा करण्यासाठी झपाटून प्रयत्न करून सचिन सैन्यात भरती झाला. सुटीवर आल्यावर गमतीजमती आणि देशाची सेवा ह्यावर तो मनमोकळेपणाने बोलायचा. त्याच्या विविध आठवणींनी संपूर्ण शहरात शोकग्रस्त वातावरण तयार झाले आहे. भोपाळ येथे कर्तव्यावर असतांना त्यांना त्रास होऊ लागल्याने लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली