इगतपुरी – एप्रिल महिन्यात इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून महिलेला ठार केले होते. ह्या महिलेच्या वारसांना आज इगतपुरीच्या वन विभागाकडून १५ लाखांची नुकसानभरपाई देण्यात आली. खैरगावचे लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण यांच्या प्रयत्नांनी १५ लाखांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण आज करण्यात आले.
खैरगाव येथील शिदवाडी ह्या गावात गावाजवळील शेतात बुधाबाई आघाण ह्या ७० वर्षीय वृद्धेवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते. एप्रिलमध्ये ही घटना घडली होती. बुधाबाई लघुशंकेसाठी घराबाहेर आल्यावर काही सेकंदातच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला. यामध्ये ही महिला ठार झाली होती. याबाबत खैरगावचे सरपंच ॲड. मारुती आघाण यांनी घोटी पोलीस ठाणे आणि इगतपुरीच्या वन अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. यासह त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून १५ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
ठार झालेली बुधाबाई आघाण यांची वारस मुलगी यमुनाबाई चंदर आघाण, चिमा चंदर आघाण, गंगुबाई पथवे यांना आज १५ लाखांचा भरपाईचा धनादेश वितरण करण्यात आला. इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, खैरगावचे वनपरिमंडल अधिकारी भाऊसाहेब राव, लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण, उपसरपंच गणेश गायकर, माजी सरपंच विठ्ठल आघाण, ग्रामपंचायत सदस्य बुधा गांगड यांच्या हस्ते धनादेश वितरण झाले. १५ लाखांपैकी ५ लाख रोख आणि उर्वरित १० लाखांच्या मुदत ठेवी केल्या जाणार आहेत. ॲड. मारुती आघाण यांनी केलेल्या प्रयत्नांनी मदत मिळाल्याने पीडित महिलेच्या वारसांनी त्यांचे आभार मानले आहेत.