इगतपुरी – इगतपुरी तालुक्यातील मानवेढे येथील आदिनाथ हनुमंता वीर हा व्यक्ती २३ जुलैपासून सापडत नव्हता. ह्या व्यक्तीचा मृतदेह मानवेढे गावापासून १० किमी अंतरावर असलेल्या एका खोल दरीत असल्याची माहिती इगतपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथकासह महिंद्रा कंपनीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. अतिशय खडतर आणि जीवघेण्या मोहिमेतून हा नृतदेह बाहेर काढणाऱ्यांचे कौतुक होत आहे. अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील मानवेढे येथील आदिनाथ हनुमंता वीर हे २३ जुलैपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह अत्यंत खोल दरीत असल्याबाबत ग्रामस्थांनी इगतपुरी पोलिसांना माहिती दिली. सततचा पाऊस आणि अतिदुर्गम खोल दरी असल्याने मृतदेह काढणे अशक्य होते. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरिष चौबे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर महिंद्रा पथकाने कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कैलास ढोकणे, सिक्युरिटी मॅनेजर जयंत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक समाधान नागरे, महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरिष चौबे, अनिल नाठे, फायरमन अजय म्हसणे, मनोज भडांगे, मानवेढे गावातील पोलीस पाटील हरिश्चंद्र भागडे आदींसह ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. सर्वांच्या अथक प्रयत्नांनी ३०० मीटर खोल असलेल्या दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोकिस निरीक्षक समाधान नागरे यांनी फायर ऑफिसर हरिष चौबे आणि त्यांच्या टिमचे आभार मानले.