इगतपुरी – इगतपुरी पोलीस ठाण्याचे पथक एका फसवणूक प्रकारणाच्या शोधासाठी आरोपीला गुजरातला घेऊन गेले असता हा आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्याची घटना २८ रोजी घडल्याची घटनेची चर्चा आहे. याप्रकरणात एका अधिकाऱ्यासह दोन पोलीस व एका महिला पोलीसाला निलंबित केल्याचेही बोलले जात आहे. पण, त्याबाबत अजून पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, इगतपुरी पोलीस ठाण्यात ३० लाखाच्या नकली सोन्याच्या फसवणुकीचा आरोपी तपासासाठी रायगड जिल्हयातुन आणला होता. सदर आरोपीस गुजरातला तपासासाठी नेले असता प्रभुभाई गुलशन भाई सोलंकी, राहणार आजवारोड, बडोदरा, गुजरात हा आरोपी इगतपुरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्यात यशस्वी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला.