इगतपुरी – लग्न समारंभात आमंत्रितांबरोबरच अनाहूत पाहुणेही येतात. कधी कधी हे पाहुणे लक्षात येतात तर कधी नाही. अनेकदा असा पाहुणे येतो तो काही तरी हेतू ठेऊनच. आताही असाच एक प्रकार कॅपटाऊन व्हिलाज रिसॉर्टमध्ये घडला आहे. लग्न सोहळ्यात एक चोरटा आला. त्याने सर्व समारंभांना हजेरी लावली. जेवणाचा आस्वादही घेतला आणि जाता जाता त्याने वधूचे तब्बल ६ लाखांचे दागिने लंपास केले आहेत.
शहरातील गावठा शिवारात राष्ट्रीय महामार्गालगत असलेले कॅपटाऊन व्हिलाज रिसॉर्ट नेहमीच पर्यटकांच्या वेगवेगळ्या घटना व वादाच्या भोवऱ्यात असते. कॅपटाऊन व्हिलाज हे रहिवासी संकुल असतांना या ठिकाणी रिसॉर्टची परवानगी नसतांनाही पर्यटकांना भाडे तत्वावर लॉजींग व लग्न समारंभासाठी ऑनलाइन बुकींग केली जाते अशी स्थानिकांची ओरड आहे. असे असतांना घोटी येथील व्यापारीच्या पुतणीचे लग्न सोहळ्याचा कार्यक्रम कॅपटाऊन हिलाजमध्ये सुरू होता. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास वधूचे सोन्याचे ६ लाख अकरा हजार रूपये किमंतीचे दागिन्यांची बॅग अज्ञात इसमाने चोरी करून पलायन केले. या घटनेबाबत नवऱ्या मुलीचा चुलता ताराचंद केवलचंद बबेरवाल (वय ४५ वर्ष, व्यवसाय- व्यापारी, रा. घोटी) यांनी चोरीच्या घटने बाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार फिर्याद दिली.
फिर्यादित म्हटले की, पुतणीचे लग्न सोहळा सुरू असतांना एक अज्ञात इसम व्यासपीठावर तोंडाला मास्क लावुन चोरीच्या तयारीने आला. कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहुन दागीने असलेली बॅग घेवुन निघुन गेला. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात व लग्न समारंभातील फोटो शुटींगमध्ये सदर इसमाच्या हालचाली व फोटोत तो कैद झाला आहे. हा इसम अनोळखी असुन लग्न सोहळयात आला की बोलावला गेला या बाबत उलट सुलट चर्चा आहे. या ठिकाणी या आधीही अनेक पर्यटकांच्या लहान मोठया चोऱ्या झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अमलदार जाधव व पोलीस हवालदार विजय रुद्रे, खिलारे आदी करीत आहे.