इगतपुरी – बेलगाव कुऱ्हे येथील पोल्ट्री व्यावसायिक संजय गुळवे यांच्या पोल्ट्री शेडजवळ काल वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूला शेळी बांधून सापळा रचण्यात आला. त्यामध्ये बिबट्या अलगद अडकला. पहाटे चार वाजताच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकल्या नंतर डरकाळ्यांनी तेथील कामगारांना जाग आली. त्यांना पाहिल्यानंतर बिबट्या पिंजऱ्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड करीत होता. पिंजऱ्याच्या लोखंडी जाळ्यांना जोरदार धडका देवून अक्षरशः बिबट्या रक्तबंबाळ झाला. याबाबत बातमी समजताच बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली.
वनविभागाला माहिती देताच वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी शैलेंद्र झुटे आपल्या रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चवताळलेल्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देवून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जंगलात सोडून देण्यासाठी घेवून गेले. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी शैलेंद्र झुटे आणि वनरक्षक आणि वनमजूर यांनी ह्याकामी परिश्रम घेतले..