इगतपुरी – दुचाकीला ट्रकने कट मारल्याने इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील चार जण जागीच ठार झाले. मुंढेगावकडे येत असताना युवकाच्या दुचाकीला ट्रकने कट मारल्याने हा अपघात झाला. यामध्ये ३ बालिका आणि १ युवक ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. या घटनेमुळे मुंढेगाव परिसर आणि इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. याबाबत घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंढेगाव येथील तुषार हरी कडू वय २४ हा युवक मोटारसायकलीवरून घोटीला दिवाळीनिमित्त काही खरेदी करण्यासाठी पायल ज्ञानेश्वर गतीर वय ११, विशाखा ज्ञानेश्वर गतीर वय ८ रा. मुंढेगाव, ईश्वरी हिरामण डावखर वय १० रा. गिरणारे ता. इगतपुरी यांना घेऊन घोटीला गेला होता. तिकडून गावाकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने कट मारला. यामध्ये मोटारसायकलीवरील चौघेही खाली पडले. त्यात सर्वांच्या अंगावरून ट्रक गेल्याने चौघे चिरडले गेले. यामध्ये सर्वांवर काळाचा घाला पडला. या घटनेमुळे मुंढेगाव परिसर आणि इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी
मुंबई आग्रा महामार्गावरील खंबाळे ते घोटी उड्डाणपुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे या परिसरात अपघातांचे सत्र वाढले आहे. या कामातील ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे आज मुंढेगाव येथील ३ बालिका आणि एका युवकाचा बळी गेला आहे. यामुळे अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार आहोत ? असा सवाल इगतपुरी तालुक्यातील शिवसेना आणि आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या उड्डाणपूल ठेकेदारावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, संबंधित अपघातग्रस्त व्यक्तींच्या गरीब कुटुंबाला आर्थिक नुकसानभरपाई द्यावी यासाठी शिवसेना आणि आगरी सेना आक्रमक झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले आणि घोटी पोलीस ठाण्यात आज याबाबत पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात करण्यात आला आहे. यापुढील प्रत्येक अपघाताला ठेकेदाराला जबाबदार धरावे असेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल लंगडे, आगरी सेनेचे प्रदेश नेते सुरेश गणपत कडू, आगरी सेना युवा जिल्हाध्यक्ष अनिल भोपे, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, नंदलाल भागडे नगरसेवक संपत डावखर, कैलास कडू, धनराज म्हसणे, सिद्धेश्वर आडोळे, राजू गतीर, जनार्दन कडू, नामदेव तांगडे, एकनाथ म्हसणे, सुनील गतीर, किशोर गतीर आदी उपस्थित होते.