इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे शाळेच्या मुख्याध्यापकानेच शिक्षकाच्या मदतीने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. या घटनेनंतर घोटी पोलिसांनी रात्रीच मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ टाकेद बुद्रुक भागात आंदोलन करण्यात आले असून तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
येथील न्यू इंग्लिश स्कुल शाळेत सहावीत शिकणाऱ्या तेरा वर्षांच्या पीडित विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अत्याचार केला. वर्गशिक्षक जोशी याने तुकाराम साबळेच्या सांगण्यावरून पीडित मुलीला शुक्रवारी दुपारी मुख्याध्यापकाच्या घरी नेले. यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांन अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवून दिले. पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांनी घोटी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेऊन मुख्याध्यापक तुकाराम साबळे, वर्गशिक्षक जोशी या संशयित आरोपींना अटक करून तपास सुरु केला आहे.
पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक अजय कौटे आणि पथक तपास करीत आहे.