इगतपुरी – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या जिंदाल पॉलीफिल्म्स् कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामावर घेण्यासाठी कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यातील उपोषणाला बसलेल्या ४ कामगारांची प्रकृती खालावली आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून आमरण उपोषणाला कोणताही प्रतिसाद मिळाला नसून त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंढेगाव येथील २५ कामगारांना जिंदाल कंपनीने कोणतेही कारण न सांगता कामावरून काढुन टाकले होते. त्यामधील १० कामगारांना कंपनी प्रशासनाने कामावर घेतले परंतु उर्वरित १५ कामगारांना १ महिन्यात कामावर घेऊ असे आश्वासन कंपनीने दिले होते. परंतु त्या १५ जणांना अद्यापही कामावर घेतलेले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरत आहे. याबाबत कामगारांनी दोन वेळा कामगार उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत उर्वरित १५ स्थानिक कामगारांना १ फेब्रुवारी २०२१ या दिवशी कामावर घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जिंदाल व्यवस्थापनाकडून संबंधित मुंढेगाव येथील १५ मुलांना कामावर घेतलेले नाही. म्हणून या स्थानिक भूमिपुत्रांनी २७ डिसेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केलेले आहे. उपोषणामुळे यादव लालू गतीर, योगेश लक्ष्मण गतीर,शांताराम अशोक कडू, संतोष रवींद्र रोकडे ह्या ४ कामगारांची तब्येत खालावली असल्याचे समजते. अजय खंडू रोकडे, विनोद सोनू गतीर, धोंडू गजरू दुभाषे, खुशाल दुंदा दळवी, गौतम रतनलाल तांगडे, माधव काशिनाथ गतीर, केशव कुंडलिक गतीर, आनंद रामचंद्र लहाने, हरिश्चंद्र महादू दुभाषे, सचिन जगन गतीर, योगेश विठ्ठल गतीर हे कामगार उपोषण सहभागी आहेत.