नाशिक : राजकीय पूर्व वैमनस्यातून इगतपुरी तालुक्यातील तळोघ येथील एका युवकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. रात्री दोनच्या सुमाराला वाडीवऱ्हे जवळ रायगडनगरला महामार्गावर ही घटना घडली आहे. जीवघेणा हल्ला करणारे पाच ते सहा व्यक्ती असून वाडीवऱ्हे पोलीस घटनास्थळी दाखल होताच पसार झाले. हल्लेखोर युवकांकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष जनार्दन माळी यांचे वाहन वापरण्यात आले आहे. हे वाहन पोलिसांनी जप्त केले असून गंभीर जखमी युवकाला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाडीवऱ्हे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील तळोघ येथील अंकुश विष्णु जोशी हा युवक नाशिकहून भाजीपाला आणून घोटीला विक्री करतो. सोशल मीडियावर त्याच्याकडून राजकीय स्वरूपाचा मजकूर प्रसारित झाला. यावरून या भागातील बड्या राजकारणी व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती आणि समर्थक आक्रमक झाले. त्यांनी संबंधित युवकाच्या घरी जाऊन त्याला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. याबाबत कालच इगतपुरी पोलीस ठाण्यात युवकाचे वडील विष्णु वाळु जोशी यांनी संबंधितांच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर अंकुश जोशी नाशिकहून रात्री दोन वाजेच्या सुमाराला भाजीपाल्याची गाडी घेऊन येत होता. त्यावेळी MH 15 GL 3435 ह्या वाहनाने त्याच्या गाडीला रोखवले. त्या गाडीतील पाच ते सहा युवकांनी उतरून अंकुश जोशी याला बेदम मारहाण आणि धारदार शस्त्राने वार केले. ही मारहाण सुरू असतांना धारदार शस्त्राने अंकुशला जीवे मारत असतांना वाडीवऱ्हे पोलिसांचे वाहन आल्याने हल्लेखोर युवकांनी वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी गंभीर जखमी युवकाला तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.