भुवनेश्वर – ओडिशा राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बेनाम संपत्ती प्रकरणी अॅन्टी करप्शन विभागाने धाडी टाकल्या असून यात भारतीय वनसेवेचे अधिकारी (IFS) अभय कांता यांची अमाप संपत्ती पाहून तपास पथकही अचंबित झाले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक आणि दक्षता विभागातील पथकाने ओडिशा मधील 1987 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी अभय कांता यांच्या बंगल्यासह विविध ठिकाणी असलेल्या संपत्तीवर जप्तीची कारवाई सुरु केली, तेव्हा त्यांच्याकडे सुमारे 50 लाखांची रोकड (कॅश) आणि त्यांच्या वाहन चालकाकडे सुमारे 20 लाख कॅश आढळून आली आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्या मुलींच्या घरात अर्धा किलो सोने आणि 10 लाख कॅश देखील सापडली. याशिवाय त्यांच्या बँक खात्यांमध्ये जवळपास 4.4O कोटी रुपये जमा आहेत.
त्यांनी भुवनेश्वरच्या साहिब नगर आणि नवीनपल्ली बॅक शाखेमध्ये मोठ्या संख्येने पैसे जमा केले. त्याच प्रमाणे त्यांच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू व टाटा हैरियर या तीन अत्याधुनिक व महागड्या कार तसेच त्यांच्या मुलाच्या नावावर यमाहा मोटरसायकल आहे.
लॉकडाऊनमध्ये हवाई सफर
चार्टर्ड फ्लाइट्सद्वारे त्यांनी लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यांमध्ये कमीतकमी २० वेळा प्रवास केला आहे. त्यांनी आपल्या मुलासाठी पुणे येथे एक फार्महाउस देखील विकत घेतले होते. ज्याचा हप्ता दरमहा पाच लाख रुपये असा होता. त्याशिवाय, गेल्या अनेक वर्षापासूनच्या राज्य वनविभागातील वनीकरण आणि अन्य योजनांच्या अतिरिक्त कामांमध्ये त्यांनी गैरकारभार केल्याचे सांगण्यात येते. या सर्व भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणारे संबंधीत विभागातील अधिकारी देखील तपास करताना आश्चर्यचकित झाले आहेत. एखादा आयएफएस अधिकारी कोणत्या प्रकारे बेहिशोबी मालमत्ता जमा करू शकतो, असा घोटाळा ते प्रथमच बघत होते.