नवी दिल्ली – आज-काल बहुतांश सगळ्यांचेच गूगल अकाउंट आहे. अनेक युजर्स दररोज गूगल अकाउंटचा वापर करतात. परंतु तुमचे अकाउंट किती सुरक्षित आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्या गूगल अकाउंट्सना हॅकरपासून कसे सुरक्षित ठेवावे ? सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार रोजच घडत असल्याने असा विचार करणे आवश्यक आहे. अशीच एक लिंक्डइनबाबतची बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार, लिंक्डइनवरील जवळपास ७ कोटी खाते हॅक झाले आहेत. तर गूगल खाते तुम्ही कसे सुरक्षित ठेवताल, हे जाणून घेऊयात.
सिक्योरिटी चेकअप
गूगल अकाउंटला सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितरित्या सेक्युरिटी चेकअप टूलद्वारे सुरक्षेची तपासणी करावी. हे काम तुम्ही फोन, टॅब किंवा कॉम्प्युटरद्वारे करू शकतात. गूगल अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी सहाय्यता करणारे हे स्टेप बाय स्टेप गाइड आहे. ते तुम्हाला पर्सनलाईज्ड आणि अॅक्शनेबल रेकमेंडेशन देते.
पासवर्ड सिक्युरिटी
गूगल अकाउंटसाठी एक भक्कम पासवर्ड निवडणे गरजेचे आहे. तुम्ही स्वतः एक भक्कम पासवर्ड निवडू शकतात. किंवा गूगलतर्फे दिलेल्या पासवर्डचाही वापर करू शकतात. पासवर्डचा सोप्या पद्धतीने वापर करण्यासाठी गूगल अकाउंटमध्ये सेव्ह करू शकता. तुम्ही त्वरित पासवर्डची तपासणी करू शकता. तुमच्या पासवर्डसोबत छेडछाड झाल्याचे आढळल्यास गूगल तुम्हाला इशारा देतो.
टू स्टेप व्हेरिफिकेशन
तुमचे गूगल अकाउंट पासवर्डने सुरक्षित असले तरी तितके पुरेसे नाहीये. अधिक सुरक्षित लॉगिनसाठी गूगल अकाउंटमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन सक्षम ठेवणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही असे केल्यानंतर नव्या डिव्हाइसमध्ये साइन इन करण्याचा प्रयत्न करत असाल तर गूगल तुम्हाला नेहमी अलर्ट करेल. तुम्हाला लॉगिन करण्याची परवानगी देण्याची परवानगीही मागेल. ज्या डिव्हाइसवर ऑनलाइन हल्ल्याची जोखिम असते, अशा अकाउंटसाठी गूगल एक अॅडव्हान्स प्रोटेक्शन प्रोग्रामसुद्धा प्रदान करतो.
हरवलेला स्मार्टफोन सापडणार
जर तुमचा फोन हरवलेला असेल, तर तुमचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी गूगल अकाउंटचा वापर करू शकतात. हे फाइंड युवर फोन पर्यायाच्या माध्यमातून शक्य होऊ शकणार आहे. जर तुमचा हरवलेला फोन अजूनही चालू असेल आणि इंटरनेट कनेक्शन अॅक्टिव्ह असेल तर तुम्ही डिव्हाइसचे ठिकाण पाहू शकता. त्याद्वारे तुम्हाला मोबाईल ट्रॅक करण्याची मदत मिळू शकेल.
सिक्योर कनेक्शन
तुमचे गूगल अकाउंटला सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित कनेक्शनचा वापर करणे आवश्यक आहे. सार्वजनिक नेटवर्कचा वापर करण्यासाठी गूगल अलर्ट करतो. सार्वजनिक नेटवर्कचा वापर करताना एखादे संकेतस्थळ सुरक्षित आहे की नाही याबाबत गूगल तुम्हाला अॅड्रेस बारमध्ये इशारा देतो.
या गोष्टींकडे लक्ष द्या
स्कॅमिंग आणि फिशिंग अजूनही सामान्य गोष्ट आहे. जीमेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. संशयास्पद ईमेल समजणे महत्त्वाचे आहे. टेक्स्ट मेसेज आणि कॉलद्वारेही हॅकिंग होऊ शकते. संकेतस्थळांवर क्लिक करण्यापूर्वी दोनदा चेक करणे आवश्यक आहे. खासगी माहिती विचारणा-या ईमेलपासूनही सतर्क राहावे.