विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतात सोन्याच्या दागिण्यांना फार महत्त्व आहे. सणावारांमध्ये आणि घरातील उत्सावांमध्ये सोन्याचे दागिणे परिधान करण्याची हौस महिलांना असते. काही लोक अशा व्यक्तिगत वापरासाठी सोने खरेदी करून ठेवतात, तर काही लोक केवळ गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. पण जास्तीचे सोने बाळगले तर प्राप्तीकर विभागाकडून तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
भारतात एका व्यक्तीने आपल्याकडे किती सोने बाळगावे, याचे काही नियम आहेत. हा नियम मोडला तर प्राप्तीकर विभागाची धाड पडलीच समजा. गोल्ड होल्डींगशी संबंधित कायदे आपण जाणून घेतले पाहिजे.
प्राप्तीकर तज्ज्ञांनुसार, जर सोने खरेदीचा स्रोत वैध आहे आणि संबंधित व्यक्तीच्या उत्पन्नानुसार आहे, तर चिंतेची काही बाब नाही. प्राप्तीकर अधिनियम, १९६१ च्या कलम १३२ नुसार कर अधिकारी तपासादरम्यान सापडलेले कोणतेही दागिणे किंवा मौल्यवान वस्तू जप्त करू शकतात. अर्थात या वस्तूंचा आणि दागिण्यांचा स्रोत सांगण्यात आपण अपयशी ठरले तर. त्यातही जर तुम्ही स्रोत सांगितला तर तुम्हाला ओरिजनल बील द्यावे लागेल. किंवा दागिणे भेट म्हणून मिळाले असतील तर गिफ्ट डीड सादर करावी लागेल.
काय म्हणते सीबीडीटी?
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) १ डिसेंबर २०१६ ला स्पष्ट केले होते की, कोणत्याही सोन्याच्या दागिण्यांच्या खरेदीला मर्यादा नसेल. पण त्याचा स्रोत सांगणे आवश्यक असेल. कर अधिकाऱ्यांना निवासी भागात किंवा बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिण्यांचा स्रोत तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे.