कराची – शिक्षणाच्या अभावामुळे पाकिस्तानात कुठलीही नवी गोष्ट स्वीकारण्यासाठी वेळ लागतो. आता कोरोनामुळे मृत्यू होत आहे, मात्र तरीही नागरिक लस घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे पाकमधील सिंध आणि पंजाब या दोन्ही प्रांतांमध्ये लस घेतली नाही तर मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन वेळच्या जेवणाऐवजी एकचवेळ जेवण मिळाले तरीही चालेल, पण मोबाईल सुरू हवा, अशी सध्या माणसाची अवस्था झाली आहे. त्यामुळे मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर नागरिक लस घेण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास सरकारला आहे.
मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही लोक लस घेण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे पाक सरकार चिंताग्रत आहे. पण आता ही समस्या सोडविण्यासाठी कठोर पावले उचलण्याची तयारी सरकारने केली आहे. पंजाब आणि सिंध प्रांतात लस न घेणाऱ्यांची मोबाईल सेवा बंद होईल. तर सिंध प्रांतात लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्यात येणार आहे.
लसीकरणावरून दुष्प्रचार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे असे निर्णय घ्यावे लागत आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहेत. लस प्रभावी आणि सुरक्षित नसल्याचे सांगितले जात आहे.
अफवांचे तर बोलूच नका
पाकिस्तानात अफवांबाबत तर काही बोलायचे कारणच नाही. पोलिओचा डोस घेतल्याने नपुंसकत्व येते आणि हे अमेरिकेचे षडयंत्र आहे, असा प्रचार इथे केला जातो. त्यामुळे मुलांना डोस देखील दिला जात नाही. त्यामुळे इथे पोलिओ लसीकरणालाही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. परिणामी पाकिस्तावात पोलिओग्रस्तांची संख्याही जास्त आहे. आता हेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या बाबतीत घडत आहे.