नाशिक – सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालय, अंगीकृत उद्योग, नगरपालिका, खाजगी क्षेत्रातील 25 किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांनी वेतनपटावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 30 जुलै 2021 पर्यंत तात्काळ सादर करावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त अ.ला.तडवी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, संघटीत क्षेत्रातील मनुष्यबळाची विश्वासार्ह सांखिकी माहिती मनुष्यबळाच्या शिक्षण, प्रशिक्षण व रोजगाराच्या नियोजनासाठी शासनास उपलब्ध व्हावी, यासाठी वरील सर्व आस्थापनांना माहिती सादर करणे बंधनकारक आहे.
सदर माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर जावून एम्लॉयर वर क्लिक करून एम्प्लॉयर लॉग इनमध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करून ईआर रिपोर्ट मधील ई-आर 1 या पर्यायावर क्लिक करून ऑनलाईन सादर करावी.
माहिती सादर करतांना काही तांत्रिक अडचणी आल्यास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या 0253-2972121 दूरध्वनी क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 या वेळेत संपर्क साधावा. जी आस्थापना आपली माहिती कार्यालयास वेळेत सादर करणार नाही, अशा आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची संबधितांनी नोंद घ्यावी, असेही सहायक आयुक्त श्रीमती. तडवी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.