श्रीनगर – आपल्या देशात कोणत्याही समाजात सर्वसाधारणपणे लग्न समारंभाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यातच मुलीचे लग्न असेल तर त्यासाठी वधूपित्याला मोठा खर्च करावा लागतो. आणखी विशेष म्हणजे हुंडा, मानपान आदी प्रकार कालानुरूप प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने अनेक समाजात अद्यापही सुरूच आहेत. मोठ्या प्रमाणावर जनप्रबोधन होऊनही रूढी परंपरा बदलण्यास तयार नसतात. देशभरातील अनेक प्रांतात या रुढी-परंपरांचा पगडा दिसून येतो. परंतु काश्मीरमध्ये असे एक गाव आहे की, तिथे हुंडा, मिरवणूक, मानपान अशा कोणत्याच गोष्टी होत नसतात. काय घडते नेमके या गावात जाणून घेऊ या…
काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातील हरमुखच्या सुंदर डोंगरांमध्ये बबवाईल हे सुंदर गाव वसलेले आहे. श्रीनगरपासून ४० कि.मी. अंतरावर असलेले हे गाव कडक नियम आणि शिस्तीसाठी संपूर्ण काश्मीरमध्ये ओळखले जाते. या गावाचे नियम ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. या गावात लग्नामध्ये हुंडा घेणे आणि देणे दोन्ही गुन्हा मानला जातो. विशेष म्हणजे मुलीच्या लोकांना लग्नात एक पैसाही खर्च करावा लागत नाही. याउलट, मुलाचे कुटुंबीय मुलीच्या कुटुंबाला लग्नाचा खर्च, वधूचे कपडे आणि चहा – पाण्याची व्यवस्था यासाठी पैसे देतात.
बडा घर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुमारे १५०० लोकसंख्येच्या या गावात ‘नो हुंडा ‘ चा नियम गेल्या ३० वर्षांपासून काटेकोरपणे लागू केला जातो. याच कारणामुळे या गावात एकही कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडली नाही. बाबाविल गावचे सरपंच महंमद अल्ताफ अहमद शाह यांनी सांगितले की, गावात केलेल्या लेखी कागदपत्रानुसार, मुला – मुलीच्या कुटुंबातील प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे, असा ठराव केला आहे.
यापूर्वी १९९० पर्यंत, या गावात सामान्य रीतिरिवाजांसह विवाह केले जात होते. मुलीचे आईवडील तिला पूर्ण हुंडा देऊन तिच्या सासरच्या घरी पाठवायचे. परंतु १९९१ मध्ये घरगुती हिंसाचाराचे एक प्रकरण येथे समोर आले. कोर्टकचेरीमुळे या प्रकरणाने गावाचे नाव बदनाम झाले. मात्र पंचायतीने समेट घडवून आणला. पती -पत्नी दोघेही एकमेकांसोबत राहण्यास आनंदाने सहमत झाले. त्यानंतर या घटनेने गावकऱ्यांच्या मनावर खोल परिमाण झाला. आणि त्याच दिवशी पंचायतीने ठरवले की आजपासून गावात कोणीही हुंडा घेणार नाही किंवा देणार नाही. यासंदर्भातील लेखी कागदपत्रावर सर्व स्थानिक लोकांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे गावात हुंडाबंदी झाल्यामुळे मुलींच्या लग्नाची चांगली सोय तर झालीच पण यामुळे अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांवरील गुन्हेही संपले. गेल्या ३० वर्षांपासून महिलांवरील अत्याचाराचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. तसेच गावात लागू असलेल्या कायद्यानुसार, जर कोणी हुंडा देताना किंवा घेताना गुंतलेला आढळला तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल.
स्थानिक लोकांनी केवळ त्यांच्या गावात हुंडा न देण्याची परंपरा मर्यादित केली आहे. स्थानिक लोकांनी ‘नो टू हुंडा सिस्टीम’ या नावाने एक मोहीमही सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ते जागरूकता कार्यक्रम आयोजित करून लोकांना विशेषतः तरुणांना प्रेरित करतात. ही मोहीम यशस्वी होऊ लागली आहे. शेजारच्या गावातील तरुण त्यात सामील होत आहेत. हुंडा न घेण्याची ही परंपरा संपूर्ण काश्मीरमध्ये स्वेच्छेने लागू केली जावी, अशी येथील ग्रामस्थांची इच्छा आहे.