नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामविकासाची संकल्पना आपल्या असाधारण इच्छाशक्ती व कर्तृत्वातून साकारणाऱ्या ग्रामसेवकांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात येते, त्याचप्रमाणे राज्यातील पेसा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना आदिवासी विकास विभागामार्फत पुरस्कार देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, सभापती संगीता गावित, गणेश पराडके, हेमलता शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जयंत उगले, प्रकल्प संचालक एम. डी. धस, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, ग्रामविकासाची पायाभरणी ही गावातील लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीने होत असते. परंतु गावातील विकास करताना ग्रामसेवकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्राम विकास अधिकारी देखील म्हटले जाते. गावाच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची भूमिका व कर्तव्ये त्यांना पार पाडायची असतात. ग्रामपंचायतीच्या सभा किंवा मासिक सभा बोलावणे, त्यासाठी योग्य त्या नोटिसेस देणे, त्याचप्रमाणे त्या सभेमध्ये जे काही झाले ते लिहिणे आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने त्या सभेमध्ये जे काही निर्णय झाले ते सूचना फलकावर लावणे. असे अनेक कार्य हे ग्रामसेवकाला पार पाडावे लागत असतात.
ते पुढे म्हणाले, प्रशासन, नियोजन, शेती विषयक योजना, कुटुंब कल्याण कार्यक्रम, ग्रामविकासाच्या कल्याणकारी योजना, गाव माहिती केंद्र, पशू संवर्धन योजनांसह बहुतांश शासकीय कार्य पार पडण्याची जबाबदारी सरकारने ग्रामसेवकाला दिलेली असते. त्यामुळे ग्रामविकासाचे निर्णय हे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी जरी घेतले असले तरी ते गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचे काम ग्रामसेवक करत असतात, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
गावातील माती आणि माणसांना जोडून ठेवणारा दुवा म्हणजे ग्रामसेवक – जि.प. अध्यक्षा सुप्रिया गावित.
गावातील रस्ते,घरकुले, सरकारी जमिनी किंवा इमारती यांची नोंद ही ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये व्यवस्थितपणे घेण्याचे कर्तव्य हे ग्रामसेवकाचे असते. तसेच जन्म मृत्यूविवाह यासारख्या नोंदी ठेवण्याचे, पाणीपट्टी किंवा विशेष पाणीपट्टी कर आकारणे या सर्व महत्वाच्या कामांमध्ये ग्रामसेवकाची भुमिका ही अत्यंत महत्वाची असते. आपण आपले एखादे काम असते म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात जातो, त्यावेळी निसंकोचपने आपण ग्रामसेवकला भेटून आपल्या शंकेचे निरसन केले करतो, कारण गावाची माती आणि माणसांना जोडून ठेवणारा दुवा हा ग्रामसेवक हाच असतो, असे यावेळी जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले.
ग्रामविकासाचा कम्युनिकेटर म्हणजे ग्रामसेवक – खासदार डॉ. हिना गावित
शासन बरेच वेळा शेतकर्यांसाठी किंवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना तयार करत असते. या योजना अमलात आलेल्या असतात. परंतु या सर्व योजनांची माहिती ही शेतकर्यांना किंवा सामान्य नागरिकांना असतेच असे नाही. तेंव्हा या योजना शेतकर्यांना किंवा ग्रामीण भागातील नागरिकांना समजावण्याची, एखाद्या योजनेबद्दल काही अपुरी माहिती कानावर पडली, त्याबाबत अधिक माहिती शेतकर्यांना किंवा ग्रामीण भागातील नागरिकांना समजावून सांगत ग्रामविकासाचा कम्युनिकेटर म्हणूनही जबाबदारी ग्रामसेवक अत्यंत जबाबदारीपूर्वक निभावत असतो, असे यावेळी खासदार डॉ. हीना गावित यांनी सांगितले.
यावेळी वर्ष 2018-19, वर्ष 2019-20, वर्ष 2020-21 व वर्ष 2021-22 या चार वर्षांतील 24 उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवकांना यांचा यावेळी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
हे आहेत आदर्श ग्रामसेवक;
▶ वर्ष २०१८-१९
ग्रामविकास अधिकारी : राजेश ब्राम्हणे, (शिरुड दिगर, ता.शहादा)
ग्रामसेवक : नितीन गावित (देवमोगरा, ता. नवापूर), श्रीमती ताराबाई पावरा (वेलखेडी, ता.धडगांव) , गणेश वसावे (साकलीउमर, ता. अक्कलकुवा), संतोष पावरा (देवपूर, ता. नंदुरबार) श्रीमती ज्योती पावरा (काझीपूर, ता. तळोदा)
▶ वर्ष २०१९-२०
ग्रामसेवक : दौलत कोकणी (सागाळी, ता. नवापूर), रोहिदास पावरा (छापरी, ता. धडगांव) श्रीमती मनिषा माळी (बिलाडी त.ह., ता. शहादा), श्रीमती वैशाली गिरासे (गंगापूर, ता. अक्कलकुवा), राजू चौधरी (धिरजगांव, ता. नंदुरबार), आरश्या वसावे (राजविहिर, ता. तळोदा) .
▶ वर्ष २०२०-२१
ग्रामविकास अधिकारी: बाय.बी. देसले (कोरीट, ता. नंदुरबार)
ग्रामसेवक : नाना वळवी (तलई, ता. धडगांव), गुलाब धनगर (कोयलीविहिर, ता. अक्कलकुवा),अनिल कुवर (तिखोरा, ता. शहादा),कु. अर्चना वसावे (लहान कडवान, ता. नवापूर) यजुर्वेंद्र सुर्यवंशी (आमलाड, ता. तळोदा).
▶ वर्ष २०२१-२२
ग्रामविकास अधिकारी: भाऊराव बिरारे (धानोरा ता. नंदुरबार) कैलास सोनवणे (खोकसा ता. नंदुरबार).
ग्रामसेवक : विजय सैंदाणे (जमाना, ता. अक्कलकुवा), विवेक नागरे (असली, ता. धडगांव), मुकेश सावंत (भुलाणे, ता. शहादा) राकेश पावरा (सलसाडी ता. तळोदा).