मुंबई – बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेने देशभरातील त्यांच्या विविध शाखा आणि कार्यालयांमध्ये कार्यकारी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण ९२० कार्यकारी पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांकडून त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
इच्छुक उमेदवार आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर उपलब्ध ऑनलाइन अर्ज भरून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया आज, ४ ऑगस्ट पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार १८ ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतील. तसेच, अर्ज शुल्क १००० रुपये फक्त १८ ऑगस्टपर्यंत भरावे लागेल. तसेच उमेदवार त्यानंतर २ सप्टेंबर पर्यंत त्यांच्या अर्जाची प्रिंट पाठवू शकतील. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की कार्यकारी पदांसाठी या बँकेद्वारे कंत्राटी तत्त्वावर भरती केली जाणार आहे.
आयडीबीआय बँकेत कार्यकारी पदावर भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून किमान ५५ टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, १ जुलै २०२१ रोजी उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गांसाठी (एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग आणि इतर) वरच्या वयोमर्यादेत शिथिलता करण्याची तरतूद आहे. तसेच अधिक तपशीलांसाठी भरती अधिसूचना पहावी, विशेष म्हणजे उमेदवाराची निवड ऑनलाईन चाचणीद्वारे केली जाईल. तसेच, या पदासाठी ३४ हजारांपासून पुढे पगार दिला जाणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.