नवी दिल्ली – कोरोनाचा धोका कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा, थिएटर आणि मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील शाळाही हळूहळू सुरू होत आहेत. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वैज्ञानिकांनी देशभरातील शाळा टप्प्याटप्प्याने उघडण्याची शिफारस केली आहे. प्राथमिक शाळांच्या मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याने प्राथमिक शाळा आधी उघडाव्यात, असा निष्कर्ष आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांच्या निरीक्षणाखाली झालेल्या वैद्यकीय अभ्यासात वैज्ञानिकांनी काढला आहे.
बहुतांश राज्ये वेगवेगळ्या दिशानिर्देशांसह शाळा उघडत आहेत. दिल्लीमध्ये माध्यमिक शाळा आधी उघडल्या आहेत. त्यानंतर प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षांच्या मुलांना संक्रमणाची जोखीम सर्वाधिक आहे. या मुलांसाठी सघ्या लस उपलब्ध नाहीत. मात्र शाळा उघडणेही आवश्यक आहे. कोविड नियमांचे पालन करून प्राथमिक शाळा सर्वात आधी उघडाव्यात. तर माध्यमिक शाळा काही काळानंतर सुरू कराव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.
आयसीएमआरचे मुख्य संक्रामक रोगतज्ज्ञ डॉ. समीरन पांडा आणि डॉ. तनू आनंद या संशोधनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या माहितीनुसार, कोविड काळात दीर्घकाळ शाळा बंद राहिल्याने मुलांच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे शाळा सुरू करणे आवश्यक आहेत. याची सुरुवात प्राथमिक शाळांनी केली जाऊ शकते. हा वैद्यकीय अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल (आयजेएमआर) मध्ये प्रकाशित होणार आहे.
यांचीच नियमित शाळा
ऑगस्टमध्ये असे निदर्शनास आले आहे की, शहरी भागात फक्त २४ टक्के मुलांनी शाळांमध्ये नियमित हजेरी लावली आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. परंतु झोपडपट्टी आणि ग्रामीण भागातील फक्त आठ टक्के मुलांनीच शाळेत उपस्थिती दर्शविली आहे. हे सर्वेक्षण १५ राज्यांमध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये १३६२ मुलांशी संवाद साधण्यात आला होता. या सर्वेक्षणात सहभागी ५० टक्क्यांहून अधिक मुलांना अर्जामधील काहीच शब्द वाचता आले, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
शाळा उघडताच संसर्ग वाढला
वैज्ञानिकांनी ब्रिटनचे उदाहरण देऊन सांगितले की, तिथे माध्यमिक शाळा सर्वात आधी उघडण्यात आल्या. त्यानंतर कोरोना संसर्ग वाढल्याचे निदर्शनास आले. शाळांमध्ये संसर्ग झालेली मुले घरी पोहोचल्यानंतर घरातील अनेक लोकांना संसर्ग झाला होता. परंतु आयर्लंडमध्ये असे काही निदर्शनास आले नाही. चौथ्या राष्ट्रीय सिरो सर्वेनुसार, सहा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना संसर्गाची जोखीम जास्त आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना ही जोखीम कमी आहे.