विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना लसीकरण आणि संसर्गाबाबत भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने देशातील पहिला संशोधन अहवाल जारी केला आहे. त्यानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ७६ टक्के लोक बाधित आढळले आहेत. बाधा झाल्यानंतर त्यातील १६ टक्के लोकांमध्येच लक्षणे दिसली. तर १० टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
अभ्यासादरम्यान, ३६१ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७४ जणांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी या लोकांना विषाणूची बाधा झाली. कोविशिल्ड लस घेणाऱ्यांमध्ये जास्त अँटिबॉडी तयार होत आहेत. तर कोवॅक्सिन लस घेणाऱ्यांमध्ये ७७ टक्के अँटिबॉडी तयार होत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील स्कवायर या नियतकालिकात प्रकाशित संशोधनानुसार, भुवनेश्वरमधील आयसीएमआरच्या विभागीय प्रयोगशाळेत देशभरातील लस घेतलेल्या ३६१ लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणीत सर्व नमुने कोरोनाबाधित आढळले. परंतु ८७ लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले नसल्याने त्या नमुन्यांना बाजूला काढून ठेवण्यात आले. २७४ लोकांना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर बाधा झाल्याचे या तपासणीत लक्षात आले. त्यामध्ये ३५ (१२.८ टक्के) जणांनी कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले होते. तर २३९ (८७.२ टक्के) जणांनी कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
यावर्षी एक मार्च ते १० जूनपर्यंत संशोधन सुरू होते. त्यामध्ये आढळले की, कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर संक्रमित झालेले ४३ टक्के आरोग्य कर्मचारी होते. दुसऱ्या लाटेदरम्यान ते कोविड वार्डातच काम करत होते. कोविशिल्ड घेतल्यानंतर १० टक्के आरोग्य कर्मचारी बाधित झाल्याचे आढळले. दोन्ही डोस घेतल्यानंतर संसर्ग होण्या मधील सरासरी काळ ४५ दिवस असल्याचे दिसून आले. तर कोवॅक्सिन घेणाऱ्यांना ३३ दिवसांतच संसर्ग झाला होता.
संशोधनादरम्यान एकाचा मृत्यू
संशोधनादरम्यान कोविशिल्ड लस घेतलेल्या एका व्यक्तीचा नंतर संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याचा दुजोरा आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. लस घेतल्यानंतर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सरकारकडून आतापर्यंत सांगण्यात आले आहे. परंतु हे प्रकरण महाराष्ट्रातील आहे. या संशोधनादरम्यान त्यासंदर्भात काहीच माहिती देण्यात आली नव्हती. हे दोन्ही प्रकरणे वेगवेगळी आहेत, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
डेल्टा व्हेरिएंट आव्हानात्मक
डेल्टा व्हेरिएंट शरीरातील अँटिबॉडी कमी करत असल्याने लसीकरणानंतरही बाधा होऊ शकते. १६ जानेवारीपासून लसीकरण अभियान सुरू झाले आहे. परंतु मार्च महिन्यामध्ये दुसर्या लाटेदरम्यान ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण डेल्टा व्हेरिएंटशी संबंधित होते. अत्यंत वेगाने ते वाढत होते. लसीचे दोन्ही डोस घेतले तरी याच व्हेरिएंटमुळे लोकांना बाधा झाली आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.