विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
संपूर्ण देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ज्या तिसऱ्या लाटेबाबत सांगितले जात होते ती वेळ आता नजिक येऊन ठेपल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ आठवडे सर्वांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.येत्या ऑगस्टपासून देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे दररोजच्या बाधितांमध्ये तब्बल ५० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. बाधितांचा रोजचा आकडा तब्बल एक लाखांवरही जाण्याची भीती आहे. तिसरी लाट दोन-तीन आठवड्यांनंतरच येण्याची शक्यता असल्याने त्याबाबत कडक उपाययोजना आणि कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक घेण्याचे टाळावे आणि गर्दीलाही प्रतिबंध करावा, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिला आहे.
आयसीएमआरचे मुख्य संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. समीरन पांडा म्हणाले की, पुढील माहिन्यामध्ये दररोजच्या बाधितांमध्ये जवळपास ५० टक्क्यांची वाढ होऊ शकते. सहाजिकच ऑगस्टमध्ये येणाऱ्या लाटे दरम्यान, दररोज एक लाखाहून अधिक बाधित संख्या नोंदविली जाऊ शकते. परंतु दुसर्या लाटेच्या तुलनेत ही लाट खूपच कमी आहे, कारण मेच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज चार लाखांहून अधिक बाधितांची नोंद झाली होती. सद्य परिस्थिती पाहिल्यास दररोज सरासरी ४० हजार बाधित नोंदविले जात आहेत.
डॉ. पांडा पुढे म्हणाले की, राज्यांमध्ये दक्षता नियमांचे उल्लंघन आणि कोविड दक्षता नियमांचे उल्लंघन हे दुसर्या लाटेचे प्रमुख कारण बनले होते. यावेळी देखील, लोकांची उदासीनता, अनियंत्रित गर्दी आणि लसीकरण पूर्ण होण्यापूर्वी सर्व काही उघडण्याचे स्वातंत्र्य ही तिसऱ्या लाटेची मुख्य कारणे बनू शकतात. कोरोना लसीवरील पॅनेलचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल देखील म्हणाले होते की, पुढील १०० ते १२५ दिवस हे देशासाठी सर्वात कठीण आहेत. यासाठी लसीकरणाला वेग द्यायला हवा. त्याद्वारेच नवीन लाट आल्यास ती रोखणे शक्य होणार आहे.
डॉ. पांडा म्हणतात की, काही ठिकाणी लशीकरणास जनतेचा पाठिंबा नसल्यामुळे कोरोना अद्याप कमी झालेला नाही. या अस्थिर परिस्थितीतून देशाला योग्य स्थितीत आणण्यासाठी सर्वच उपाययोजना आणि नियम पाळणे आवश्यक आहे अद्याप उशीर झालेला नाही. देशातील प्रत्येक व्यक्ती नियमांची काळजी घेत असेल किंवा त्यांनी एकमेकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले तर परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्य तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात की, देश अजूनही दुसऱ्या लाटेतून बाहेर पडायचा प्रयत्न करीत आहे, परंतु जर लोकांनी सहकार्य केले नाहीत तर, देश तिसऱ्या लाटेत प्रवेश करेल.