नवी दिल्ली – देशभरातील प्राथमिक शाळा लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने हिरवा कंदील दर्शविला आहे. मात्र, माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालय यांच्या उघडण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.
देशभरात कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरू लागली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काही राज्यांमध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत. तर काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. परंतु अद्याप काही राज्यांचा शाळा सुरू करण्याबाबत विरोध असल्याचे दिसून येत आहे.
आयसीएमआरने स्पष्ट केले आहे की, मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने प्राथमिक शाळा सुरु होणे आवश्यक आहे. त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण संस्था उघडण्यास हरकत नाही. अर्थात याकरिता शिक्षकांचे लशीकरण होणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्यानंतर काही राज्यांनी इयत्ता नववी ते बारावीच्या हळूहळू शाळा सुरू करण्याची घोषणा केली असली तरी प्रथम प्राथमिक वर्गात शिक्षण सुरू करण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी चौथ्या सेरो सर्वेक्षणात नमूद केले की, मुलांवर कोरोनाचा परिणाम प्रौढांच्या तुलनेत कमी होतो. कोरोना विषाणूच्या पेशींचा वाईट परिणाम मुलांमध्ये कमी असतो आणि प्रतिकूल परिणाम कमी दिसतात.
डॉ. भार्गव पुढे म्हणाले की, शाळा सुरू करताना शिक्षकांसह सर्व कर्मचार्यांना लशीचे दोन्ही डोस देणे अनिवार्य असून मुलांना शाळेत नेणाऱ्या बसेसमध्येही कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. यानंतर माध्यमिक शाळा पुन्हा सुरू करता येतील. मात्र हा निर्णय जिल्हा व राज्यस्तरावर घेण्यात येईल. तसेच शाळेशी निगडीत सर्व लोकांनाही लस मिळण्याची खात्री करावी लागेल, तेथे विविध चाचणी नंतर पॉझेटिव्हचे प्रमाण किती आहे आणि सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती काय आहे याची देखील काळजी घ्यावी लागेल.
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही सल्ला दिला की, जिथे कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शाळा सुरू करता येतील. ५ टक्क्यांहून कमी संसर्ग दर असलेल्या जिल्ह्यांत शाळा सुरू करण्याची योजना तयार केली जाऊ शकते. तसेच मुलांना शाळांमध्ये आणण्यासाठी योग्य पर्याय शोधले गेले पाहिजेत.
या राज्यात सुरू
कोरोना संसर्गातील घट लक्षात घेता अनेक राज्यांत विविध नियम व सुरक्षेसह शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पंजाब, बिहार, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. तथापि, यासाठी पालकांची संमती आवश्यक असून ऑनलाईन वर्गही सुरू आहेत.
या राज्यात तयारी
मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश राज्यात शाळा सुरू करण्याची तयारी झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये अर्ध्या क्षमतेसह दोन्ही शाळा व महाविद्यालये सुरू केली जातील. विद्यार्थ्यांना दोन तुकड्यांमध्ये विभागले जाईल आणि प्रत्येक बॅचला एक दिवसाआड शाळेत यावे लागेल. ओडिशामधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू राहतील.
या राज्यात अद्यापही निर्णय नाही
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, अनेक राज्ये अद्याप शाळा उघडण्याच्या वचारात नाहीत. या राजस्थानमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली यांचा समावेश आहे. तसेच छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, तामिळनाडू, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, पुडुचेरी येथेही शाळा बंद आहेत. उत्तर प्रदेश मध्ये शिक्षक आणि इतर कर्मचार्यांसाठी १ जुलैपासून शाळा सुरू झाल्या आहेत, परंतु विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाइन अभ्यास करावा लागेल.