विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील ८० टक्के कोविड रुग्णांना ताप, घसा दुखणे, खोकला अशी सामान्य लक्षणे दिसत आहेत. ही श्वसन प्रणालीतील सर्वसाधारण संसर्गाची लक्षणे असून, संबंधित रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. मात्र त्यासाठी घेतल्या जाणार्या आयब्रुफेन आणि अशा प्रकारच्या वेदनाशामक औषधांमुळे रुग्णांची तब्येत आणखी बिघडू शकते. रुग्णांचे हृदय काम करणे बंद पडणे तसेच मूत्रपिंडाला बाधा होण्याची शक्यता अधिक असते, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिला आहे.
खूपच गरज असेल तर रुग्णांनी पॅरासिटामोलसारखे औषध घ्यावे. नॉन स्टेरॉइड अँटी इफ्लेमेट्री औषधे घातक असल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे. सामान्य रुग्णांकडून नेहमीच विचारल्या जाणार्या प्रश्नांवलीची उत्तरे आयसीएमआरकडून देण्यात आली आहेत.
यामध्ये रक्तदाबाच्या औषधांमुळे कोविड रुग्ण गंभीर होतो, याबाबतचा कोणताच पुरावा अद्याप मिळालेला नाही. ही औषधे हृदविकाराचसाठी कामी येतात. हृदयाला काम करण्यासाठी मदत करतात आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करतात. रुग्णाने स्वतःहून औषध बंद केले तर घातक ठरू शकते. त्याच्या हृदयाला नुकसान होऊ शकते.
जुने आजार जसे हृदयरोग, मधुमेह, अतिउच्च ताणतणावाच्या रुग्णांना कोरोना संसर्ग लवकर होण्याच्या शक्यतेला आयसीएमआरने फेटाळले आहे. याबाबत अद्याप पुरावे मिळाले नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. परंतु अशा आजारांच्या रुग्णांमध्ये कोविडचे गंभीर रुग्ण असू शकतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वैद्यकीय तज्ज्ञ आणि हृदयरोग तज्ज्ञांच्या अनुभवाच्या आधारावर हे दावे करण्यात आले आहेत.
मधुमेहावर ठेवावे लक्ष
आयसीएमआरनुसार, मधुमेहाचे रुग्ण जर आजारावर नियंत्रण ठेवू शकत नसतील तर त्यांना अनेक प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका आधीच वाढलेला असतो. अशा रुग्णांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावे. तसेच दररोज व्यायाम करावा. नियमित औषधे घ्यावीत. रक्तातील शुगरची पातळी नेहमी तपासावी.
मधुमेहींना बाधा झाल्यास…
अशा रुग्णांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीची नेहमी तपासणी करावी. त्यांच्या औषधांना विशेष करून इन्सुलिनच्या मात्रेला वेळोवेळी निर्धारित करावे लागते. अशा रुग्णांनी दिवसभरातून थोड्या थोड्या वेळाने जेवण करावे. योग्य प्रमाणात द्रव्य पदार्थाचे सेवन करण्यावर विशेष लक्ष द्यावे.
जुन्या आजारांची औषधे घेत राहावी
आयसीएमआरच्या दाव्यानुसार, कोरोनाची लक्षणे आढळली तरीही जुन्या आजारांची औषधे डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय बंद करू नये. महामारीच्या काळात डॉक्टर उपलब्ध होत नसतील तर अशी औषधे सुरू ठेवणे हिताचे ठरेल. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणारी औषधेही घेऊ शकतात.