विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने जवळपास दुप्पट गर्भवतींना आपल्या कवेत घेतले आहे. गर्भवती, सत्नदा माता आणि नवजात बाळांना कोरोनाची बाधा झाल्याचा आकडा सरकारकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे गर्भवतींना लसीकरण करावे किंवा नाही याबाबत योग्य प्रकारे संशोधन होत नव्हते. अखेर अधिकृतरित्या गर्भवतींची नोंदणी करण्याची घोषणा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर)ने केली आहे. त्यामुळे त्यांच्या लसीकरणाबाबतही निर्णय घेता येणार आहे.
१ एप्रिल २०२० पासून ३१ जानेवारी २०२१ पर्यंत पहिल्या आणि १ फेब्रुवारीपासून ते १४ मे २०२१ पर्यंतच्या दुसर्या लाटेदरम्यान गर्भवतींच्या संसर्गाबाबत एक अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये असे लक्षात आले की, पहिल्या लाटेदरम्यान ११४३ पैकी १६२ (१४.२ टक्के) महिला कोरोनाबाधित झाल्या. दुसर्या लाटेत ३८७ पैकी १११ कोरोनाबाधित आढळल्या आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गर्भवतींचा मृत्यूदर ५.७ टक्के नोंदविण्यात आला आहे. पहिल्या लाटेदरम्यान हा दर ०.७ टक्केच होता. गर्भवती किंवा नवजात अर्भक कोरोनाबाधित होण्याबाबत वैद्यकीय कागदपत्रे खूपच मर्यादित असल्याने आयसीएमआरने राष्ट्रीय स्तरावर नोंदणी कार्यक्रम सुरू केला आहे. देशभरातील रुग्णालयांमध्ये अशा प्रकरणांची माहिती मिळणार असून, त्याचा वापर पुढे संशोधनासाठी होऊ शकणार आहे.
पहिल्या लाटे दरम्यान १,१४३ पैकी ८ गर्भवतींचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला होता. परंतु दुसर्या लाटेत ३८७ पैकी २२ गर्भवतींचा मृत्यू झाला. स्थानिक पातळीवर याहून अधिक गर्भवती आणि नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्याबाबत माहिती एकत्रित केली जात आहे. गर्भवतींचे लसीकरण करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यावरही विचार सुरू आहे.