नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लशीचा एक किंवा दोन डोस घेतलेल्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. पण, या रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची खूपच कमी आवश्यकता भासली आहे. तसेच अशा बाधितांचा मृत्यूही झाला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही परिस्थिती कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळेच निर्माण झाल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) एका अभ्यासात म्हटले आहे.
डेल्टाच जबाबदार
आयसीएमआरचे वरिष्ठ वैज्ञानिक सांगतात, या अभ्यासात महाराष्ट्र, केरळ, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक, मणिपूर, आसाम, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, पुद्दुचेरी, दिल्ली, बंगाल आणि तामिळनाडूतील एक किंवा दोन लशीचे डोस घेतलेल्या एकूण ६७७ लोकांचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये ७१ जणांनी कोवॅक्सिन, ६०४ जणांनी कोविशिल्ड आणि दोन जणांनी चिनी सिनोफार्म लशीचे डोस घेतले होते. लस घेतलेल्या ८६ टक्क्यांहून अधिक संसर्ग डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले आहे. भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसर्या लाटेला हाच डेल्टा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्याशिवाय कप्पा आणि अल्फा व्हेरिएंटसुद्धा काही रुग्णांंमध्ये आढळला आहे.
यापासून संरक्षण
कोरोना संसर्ग पूर्णपणे रोखण्यास प्रतिबंधित लस यशस्वी झाली नसली तरी, संसर्गाची गंभीरता कमी करण्यास उपयोगी ठरली आहे, असे वैज्ञानिक सांगतात. अभ्यासात सहभागी ६७७ रुग्णांपैकी फक्त तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ०.०४ टक्के आहे. कोरोनामुळे मृत्यूदर १.३३ टक्के कायम आहे. ६७७ रुग्णांपैकी फक्त ६७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली. एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांच्या तुलनेत हा आकडा ९.९ टक्के आहे.
लक्षणे
लस घेतल्यानंतर संसर्ग झालेल्यांमध्ये कोणती लक्षणे दिसली, हेसुद्धा आयसीएमआरच्या अभ्यासात जाणून घेण्यात आले. सर्वाधिक ६९ टक्के रुग्णांमध्ये ताप, ५६ टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखी, कसकस, ४५ टक्के रुग्णांमध्ये खोकला, ३७ टक्के रुग्णांमध्ये घशात खवखव, २२ टक्के रुग्णांमध्ये गंध आणि चव जाणे, ६ टक्के रुग्णांमध्ये जुलाब, ६ टक्के रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि १ टक्के रुग्णांमध्ये डोळ्यात जळजळ आणि लाल होण्याच्या तक्रारी आढळल्या आहेत.
या तक्रारी अधिक
दुसर्या लाटेत बहुतांश रुग्णांना श्वास न घेता येण्याच्या अधिक तक्रारी होत्या. त्यामुळेच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. लस घेणार्या रुग्णांपैकी केवळ सहा टक्के रुग्णांना श्वास घेण्याच्या तक्रारी दिसून आल्या.