विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आता घरबसल्या कोरोना चाचणी शक्य आहे. त्यासाठीच्या प्रस्तावाला भारतीय आरोग्य संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिली आहे. रॅपिड अँटिजन चाचणीचा उपयोग रुग्णाच्या घरी करण्यासंदर्भात काही मार्गदर्शकतत्वेही त्यांनी जारी केली आहेत. होम बेस्ड टेस्टिंग किट (होम टेस्टींग)ला आता अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.
अँटिजन टेस्टचा रिपोर्ट तातडीने मिळायचा तर आरपीसीआरचा रिपोर्ट येण्यासाठी चोवीस तासांची प्रतिक्षा करावी लागाची. मात्र घरबसल्या चाचणी करून वेगाने रिपोर्ट्स देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. कोरोना चाचणी केंद्रांवर जाऊन इन्फेक्शनचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्या होत आहे. शिवाय लांबच लांब रांगामुळेही वैताग आणला आहे. पण आता घरीच चाचणी झाली तर मोठी समस्या सुटणार आहे.
सौम्य लक्षणे असलेले किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेले लोक ही चाचणी करू शकतात, असे परिषदेने म्हटले आहे. यात अद्याप जास्त प्रमाणात चाचण्या करण्याचा सल्ला परिषदेने दिलेला नाही. पण या चाचणीच्या किट्स तातडीने मार्केटमध्ये येणार नाहीत. त्यामुळे त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
भारतात सध्या केवळ मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन या एकाच कंपनीला यासंदर्भातील मंजुरी देण्यात आली आहे. होम टेस्टिंग मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर व अॅप्पल स्टोअरवर उपलब्ध आहे. ते कुणीही डाऊनलोड करू शकते. चाचणी प्रक्रियेत हे अॅप अत्यंत महत्त्वाचे आहे.
मोठ्या प्रमाणात अँटिजन नको
भारतीय आरोग्य संशोधन परिषदेने मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटिजन करणे योग्य नसल्याचा सल्ला दिला आहे. संक्रमण सिद्ध झालेले लोक, त्यांच्या संपर्कात आलेले आणि ज्यांना सौम्य लक्षणे जाणवत आहेत अश्यांचीच रॅपिट अँटिजन व्हायला हवी, असे परिषदेने म्हटले आहे. मात्र संपूर्ण भारतात आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल यायला चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने लोकांनी अँटिजन टेस्टच्या दिशेने मोर्चा वळवला.